‘लोकसत्ता लोकांकिका’साठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर

महाविद्यालयीन सर्जनशील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीपासून ते मालिका आणि चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत पदार्पण करण्याची दारे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे २४ नोव्हेंबरपासून सुरू होणारे पाचवे पर्व महाविद्यालयीन युवा रंगकर्मीना खुणावते आहे. या मानाच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत. २१ नोव्हेंबर ही या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे वेळ न दवडता लोकसत्ता लोकांकिकाच्या व्यासपीठावरचा तुमचा सहभाग निश्चित करा.

या अनोख्या एकांकिका स्पर्धेचा मंच पुन्हा एकदा तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला घेऊन येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून उमटणारी ही तरुण सर्जनशील प्रतिभा ‘लोकसत्ता लोकांकिका’द्वारे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर येते. सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ ची नाटय़धुमाळी २४ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरू होणार आहे. राज्यभरात आठ विभागांमधील स्पर्धा केंद्रे जाहीर झाली आहेत. स्पर्धेच्या नेहमीच्या स्वरूपाप्रमाणे याही वर्षी प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि त्यानंतर महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी स्पर्धकांना चुरशीचा सामना करावा लागणार आहे.

‘लोकांकिका’चा प्रवास मुंबईत २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या विभागीय प्राथमिक फेरीपासून सुरू होईल. त्यानंतर ठाणे (१ आणि २ डिसेंबर), नाशिक (७ आणि ८ डिसेंबर), रत्नागिरी (४ डिसेंबर), पुणे (१ आणि २ डिसेंबर), कोल्हापूर (१० आणि ११ डिसेंबर), औरंगाबाद (३ आणि ४ डिसेंबर) आणि नागपूर (२ आणि ३ डिसेंबर) असे वळण घेत ही स्पर्धा विभागीय अंतिम फेरीच्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेईल. त्यानंतर ८ ते १० डिसेंबरदरम्यान विभागीय अंतिम फेऱ्यांच्या माध्यमातून हा प्रवास वेग घेईल. त्यात निवड झालेल्या सवरेत्कृष्ट आठ विभागीय एकांकिकांमधून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाणार आहे.

‘एरेना मल्टिमीडिया’ या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहतील. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी सुरुवातीपासूनच टॅलेंट सर्च पार्टनर म्हणून बरोबर असलेले ‘आयरिस प्रॉडक्शन’ याही वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर चमकणाऱ्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देणार आहेत.