सामाजिक, राजकीय, कौटुंबिक समस्यांचे नाटय़ाविष्कार सादर

नाटय़वेडय़ा युवा कलाकारांना चौकटीबाहेरचे विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या आणि विविध नाटय़स्पर्धाच्या भाऊगर्दीत वेगळा ठसा उमटविलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’च्या पर्वाची नांदी रविवारी मुंबई विभागातून झाली. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात घेतलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयांनी विविध विषयांवरील एकांकिका सादर केल्या. त्यातील सहा एकांकिकांची मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. विषय आणि आशयांचे वैविध्य हे मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीचे वैशिष्टय़.

मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीतून ‘सेल्फी मग्नता’ (वझे-केळकर महाविद्यालय), ‘हुतूत’ (म. ल. डहाणूकर महाविद्यालय), ‘पैठणी’ (पाटकर-वर्दे महाविद्यालय), ‘देव हरवला’ (सिद्धार्थ आनंदभवन महाविद्यालय), ‘मिस अँण्ड मिसेस फिफ्टी फिफ्टी’ (गुरुनानक खालसा महाविद्यालय) आणि ‘तुरटी’ (महर्षी दयानंद महाविद्यालय) या एकांकिकांची मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. समाजाला भेडसावणाऱ्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि भौगोलिक समस्यांचे प्रतिबिंब प्राथमिक फेरीतील एकांकिकांमध्ये पाहायला मिळाले. येत्या १ डिसेंबरला माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात सकाळी दहा वाजल्यापासून मुंबई विभागाची अंतिम फेरी रंगणार आहे. या फेरीत सहा एकांकिका सादर होतील.

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेन्ट हण्ट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टीमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेचे ‘टेलिकास्ट पार्टनर’ झी मराठी आणि न्यूज पार्टनर ‘एबीपी माझा’ आहेत.

वेगळे विषय, सादरीकरणातील नावीन्य यामुळे चुरशीच्या झालेल्या या प्राथमिक फेरीसाठी नाटय़समीक्षक आणि कवी नीलकंठ कदम, नाटककार आणि दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मुंबईच्या विभागीय प्राथमिक फेरीसाठी स्पर्धेचे टॅलेन्ट हण्ट पार्टनर असलेल्या ‘आयरिस प्रॉडक्शन’चे विद्याधर पाठारे आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी हे खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

असे आशय, असे विषय

मुंबईतील महाविद्यालयीन नाटय़कर्मीच्या सळसळत्या उत्साहात एकाहून एक सरस अशा एकांकिका प्राथमिक फेरीत सादर झाल्या. दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे वडील-मुलाच्या नात्याची झालेली फरफट डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘हुतुतू’ एकांकिकेने मांडली. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या ‘लज्जा द्यावी सोडून’ या एकांकिकेने लैंगिकशिक्षणावर भाष्य केले, तर श्रेयवादाची लढाई जिंकण्यासाठी दोन राजकीय प्रतिस्पध्र्यामध्ये रंगलेली जुगलबंदी आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेली तेढ रुईया महाविद्यालयाने ‘एकादशावतार’मधून मांडली. परदेशी स्थायिक झालेल्या मुलाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या वडिलांची भावनिक कहाणी कीर्ती महाविद्यालयाने ‘ती पहाट केव्हा होईल’मध्ये सादर केली. खालसा महाविद्यालयाने दोन पिढय़ांमधील कौटुंबिक नियमांची मोडलेली चौकट ‘मिस अँण्ड मिसेस फिफ्टी फिफ्टी’ या एकांकिकेतून दाखवली. विद्यार्थ्यांअभावी बंद पडू पाहणारी शाळा सुरू ठेवण्याची एका सामान्य शिक्षकाची असामान्य धडपड चेतना महाविद्यालयाच्या ‘मु. पो. साखरगाव’मध्ये दिसली. एकेकाळी भक्तीभावात न्हाऊन निघालेला वारीतील भाव हरवला का?, असा प्रश्न करत वारीच्या बदललेल्या स्वरूपावर सिद्धार्थ महाविद्यालयाने ‘देव हरवला’ या एकांकिकेतून भाष्य केले.