‘लोकसत्ता लोकांकिका’ मंचावर अभिनेता मनोज वाजपेयींची भूमिका

कर्तृत्वाच्या जोरावर अधिकारवाणीने बोलण्याची ताकद असलेला बुद्धिजीवी, प्रतिभावंतांचा एक मोठा वर्ग सामाजिक, राजकीय घडामोडींवर भूमिका घेत नाही. तो राजकारणास बिचकतो. असे होते याचे कारण आपल्याकडचे राजकारण सूडबुद्धीने चालते. म्हणून देशात प्रामाणिक लोकशाही मूल्ये असण्याची गरज आहे, असे ठाम मत हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केले.

सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात लोकशाही मूल्यांना धर्म मानून त्याचे आचरण व्हायला हवे. मात्र आपला धर्मविचार हा अनेक संकल्पनांमध्ये विखुरलेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आदर्श लोकशाहीच्या मार्गाने जाण्याचे प्रयत्न लोकांकडून होतात, पण सत्ताकेंद्रित व्यवस्थेपुढे ते तोकडे पडतात, असे सांगत वैचारिक जडणघडणीत रंगभूमी मोलाची भूमिका बजावते. त्यासाठी तरुणांनी रंगभूमीकडे वळायला हवे, असा सल्लाही मनोज वाजपेयी यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळयाच्या निमित्ताने दिला. ‘लोकसत्ता लोकांकिका ’ २०१८ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शनिवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मनोज वाजपेयी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले. अथक संघर्षांनंतर चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून लौकिक कमावलेल्या मनोज वाजपेयी यांच्याशी त्यांच्या रंगभूमीवरच्या प्रवासापासून ते राजकीय-सामाजिक भूमिका घेण्यासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर गिरीश कुबेर यांनी संवाद साधला.

या कार्यक्रमात तरुण रंगकर्मीशी संवाद साधणारे मनोज वाजपेयी या स्पर्धकांचा जल्लोष, त्यांनी सोप्या पद्धतीने मांडलेले अवघड विषय पाहून भारावून गेले. रोजच्या जगण्यातील या विषयांचे प्रतिबिंबच साहित्यात उमटत असते. साहित्याचा आणि रंगमंचाचा घनिष्ठ संबंध असल्याने ते विषय नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येतात. नाटक हा कलाकार आणि लोकांमध्ये थेट संवाद साधणारा मंच आहे. त्यासाठी साहित्यातून हे विचार सरळसोप्या पद्धतीनेच मांडले गेले पाहिजे, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले.

रंगमंच हे अभिजात माध्यम आहे. या माध्यमातून कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये थेट संवाद साधला जातो. हा रंगमंचीय संवाद कलाकारालाच ऊर्जा देतो असे नाही तर ती कलाकृती पाहणाऱ्यांनाही एक विचार देतो. माणूस घडवण्याची प्रक्रिया ही रंगभूमीमुळे होत असल्याने प्रत्येक समाजात समृद्ध रंगभूमी गरजेची आहे. तरुणांनी प्रेक्षकांच्या भूमिकेतूनही नाटय़संस्कृतीचा भाग व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी महाविद्यालयीन रंगकर्मीना केले.

‘सत्या’ अजूनही स्मरणात

‘सत्या’ चित्रपटातून भिकू म्हात्रे म्हणून रुपेरी पडद्यवर लोकप्रिय झालेल्या मनोज वाजपेयी यांची ती प्रतिमा आजही अबालवृद्धांमध्ये घर करून आहे, याची प्रचिती यावेळी पुन्हा एकदा आली. मला मराठी बोलता येत नाही. मराठी व्यक्तिरेखा साकारायची असेल तर दीड-दीड महिना मेहनत घेऊन मी ती प्रामाणिकपणे साकारतोही मात्र भिकू म्हात्रेच्या भूमिकेमुळे अगदी ट्रॅफिक पोलिसांपासून सगळ्यांचाच मला मराठी उत्तम येत असल्याचा गैरसमज होतो, असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.