मुंबई : अभ्यास आणि तालीम अशा दुहेरी कसरतीत रमलेल्या मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा कस शनिवारी रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीच्या निमित्ताने लागणार आहे. विषयातील वैविध्य, कसदार अभिनय, उत्कृष्ट नियोजन, दिग्गज नाटय़कर्मीची उपस्थिती या गुणवैशिष्टय़ामुळे गेल्या पाच वर्षांत ‘लोकसत्ता लोकांकिका’ने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रुपाने महाविद्यालयीन स्तरावर कलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. यंदाही राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक फेरी दरम्यान परीक्षक आणि कलाकार यांच्यात होणारा संवाद हे स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टय़. परीक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे कलाकारांना आपल्या भूमिकेत बदल करण्यास वाव मिळतो. तीन टप्प्यांत पार पडणाऱ्या या स्पर्धेत नाटय़वर्तुळातील ज्येष्ठ मंडळींची उपस्थिती नवोदित कलाकारांना हुरुप देणारी ठरते.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे प्राथमिक फेरीस सुरुवात झाली आहे.  ठाणे केंद्रावर ७ आणि ८ डिसेंबर, मुंबईला ७ आणि ९ डिसेंबर तसेच रत्नागिरीमध्ये ७ डिसेंबरला प्राथमिक फेरी होणार असून कलाकारांचा आता खरा कस लागणार आहे. या तीन केंद्रांवर रंगणाऱ्या प्राथमिक फेरीतून उत्तम सादरीकरण करणाऱ्या काही निवडक महाविद्यालयांची निवड विभागीय अंतिम फेरीसाठी होईल. तर विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या एकांकिकेची निवड महाअंतिम फेरीसाठी होईल. प्राथमिक, विभागीय, अंतिम यातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या आठ एकांकिका मुंबईतील महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

महाअंतिम फेरीमध्ये नसिरुद्दिन शाह यांची उपस्थिती

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस लाभणारी दिग्गज नाटय़कर्मीची उपस्थिती ही रसिकांसाठी प्रमुख आकर्षण असते. गेल्यावर्षी चतुरस्र अभिनेता मनोज वाजपेयी महाअंतिम सोहळ्यास उपस्थित होते. आपल्या अभिनयाने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रयोगाशील अभिनेते नसिरुद्दीन शाह महाअंतिम फेरीस उपस्थित राहणार आहेत. मुंबईत २१ डिसेंबरला यशवंत नाटय़गृहात रंगणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात त्यांचे अनुभव, विविध भूमिका करण्यामागचे त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत.

पुण्यातील यशस्वी पंचक..

पुणे विभागाची प्राथमिक फेरी गुरुवार आणि शुक्रवारी स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात मोठय़ा उत्साहात झाली. प्राथमिक फेरीचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक प्रमोद काळे, ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा दाते यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. आता १३ डिसेंबर रोजी भरत नाटय़ मंदिर येथे विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे. कसदार विषय आणि नेटक्या सादरीकरणाच्या जोरावर फग्र्युसन महाविद्यालय (टिळा), बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (कुणीतरी पहिलं हवं), काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (टॅन्जंट), मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड (कन्सेप्ट) आणि स. प. महाविद्यालय (ऐनावरम) यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

‘लोकसत्ता’ने एकांकिका स्पर्धा आयोजित करणे याला वेगळे महत्त्व आहे. त्याशिवाय राज्यभर तीन टप्प्यांत स्पर्धा आयोजित करून सर्वोत्कृष्ट एकांकिका निवडली जाणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे खास कौतुक. पुणे विभागीय प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिका नेटक्या होत्या. काही एकांकिकांमध्ये नवखेपण दिसत होते. पण विषय निवड, सादरीकरणात प्रामाणिकपणा दिसत होता. 

– प्रमोद काळे, परीक्षक

विद्यार्थ्यांनी एकांकिकांसाठी विषय निवडताना अधिक जागरुक असायला हवे. त्यांच्या अवकाशातील, त्यांच्या आजूबाजूचे, त्यांच्याशी संबंधित विषय निवडून ते मांडणे जास्त महत्त्वाचे आहे. प्राथमिक फेरीत सादर झालेल्या काही एकांकिकांचे विषय फारच छान होते. 

– प्रतिभा दाते, परीक्षक

प्राथमिक फेरीच्या दोन दिवसांत काही एकांकिका उत्तम झाल्या. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना आयुष्याचा अनुभव कमी असला, तरी त्यांचे लेखन विचारप्रवर्तक असते. नवीन विषय हाताळले गेले. नेपथ्य, संगीत अशा घटकांवरही विद्यार्थी चांगले काम करतात. त्यांना शिकण्याची खूप छान संधी या स्पर्धेतून मिळते. 

– अभय परळकर, रोहिणी परळकर, आयरिस प्रॉडक्शन

औरंगाबाद विभागातून पाच एकांकिकांची निवड..

या विभागाच्या अंतिम फेरीसाठी यशस्वी पाच एकांकिकांची निवड करण्यात आली असून १० डिसेंबर रोजी त्यातून एका स्पर्धकाची निवड होईल.  या विभागात सरस्वती भुवनच्या नाटय़शास्त्र विभागाची ‘काळोखाचा रंग कोणता?’, नगर येथील न्यू आर्ट कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजची ‘अंत्यकथा’, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबादची ‘शाम-ए-प्रतीक्षा’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाची ‘कसरत’ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ललित कला विभागाची ‘रक्षक’ या एकांकिकांची निवड करण्यात आली.  अभिनेते नितीन धंदुके आणि अमेय दक्षिणदास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी मे. बी. जी. चितळे डेअरीचे विभागीय विक्री व्यवस्थापक प्रवीण देशपांडे,आयरिसचे विद्याधर पठारे, विवेक रानवडे आदी उपस्थित होते.

‘‘ ‘लोकसत्ता’च्या वतीने लोकांकिकांचा उपक्रम सुरू झाल्यापासून विविध भागातील कलाकांराना संधी मिळू लागली. घरी नाटक होते. त्यामुळे कलाकांराना संघर्ष करावा लागत असे. या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन तरुणांचा नाटय़क्षेत्रातील संघर्ष कालावधी कमी होण्यास मदत होईल. ’’

– विद्याधर पठारे, आयरिस प्रतिनिधी

‘लोकसत्ता-लोकांकिका’ उपक्रम चांगला आहे. कला ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी वाचन, चिंतन लागते. जगण्याचे भान देते. असे भान देणारा हा उपक्रम आहे. मात्र, अधिक आशयघनतेसाठी नाटय़शाळा प्रशिक्षणांची गरज आहे. 

– नितीन धंदुके, परीक्षक

‘औरंगाबादमध्ये या स्पर्धेविषयी तरुण कलावंतांमध्ये कमालीची उत्सुकता असते. अशा स्पर्धासाठी आयरिस सारखी कलावंताचा शोध घेणारी संस्था आहे. त्यामुळे अधिक तयारीने या स्पर्धेत उतरावे लागणार आहे.

 – अमेय दक्षिणदास, परीक्षक

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.