नव्या-जुन्या तरुण महाविद्यालयीन कलाकारांना आपले विविधरंगी नाटय़कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. नाटय़विश्वात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकि केची दरवर्षी तरुणाई आतुरतेने वाट पाहात असते. रंगभूमीवरून सुरुवात करून मालिका-चित्रपटविश्वात अभिनेता, लेखक-दिग्दर्शक म्हणून स्थिरावण्याची स्वप्ने अनेक तरुण नाटय़कर्मी पाहतात. त्यांच्यासाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा मोठे व्यासपीठ बनले आहे. या अनोख्या स्पर्धेचे सहावे पर्व येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांमधील तरुणाई एका व्यासपीठावर येते. वेगवेगळे नाटय़विचार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार झालेली वैचारिक-सांस्कृतिक जडणघडण सोबत घेऊन आलेल्या या तरुण नाटय़कर्मीची सर्जनशील घुसळण यानिमित्ताने ‘लोकांकिका’च्या मंचावर होते. वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान, एकांकिके ची मांडणी, अभिनयातला जोश यांचा चपखल वापर करत आपला विषय मांडणारी तरुणाई ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर तयारीनिशी येते. त्यामुळे कसलेल्या कलाकारांनी रंगवलेल्या या एकांकिकोंमधून महाराष्ट्राची ‘लोकसत्ता लोकांकिका’ निवडण्याचा हा प्रवास तितकाच बहारदार असतो.

हा चैतन्याने सळसळणारा आविष्कार पुन्हा साकारायचा असेल, तर स्पर्धेची चाहूल घेत आतापासूनच तयारीला लागा. या स्पर्धेचे परीक्षण हे अनुभवी कलाकारांकडून केले जाते. इतकेच नव्हे तर हे कलाकार तरुण नाटय़कर्मीना वेळोवेळी मार्गदर्शनही करतात. याच मंचावरून पुढे आलेले अनेक कलाकार आज नाटक-चित्रपट-मालिकाविश्वात स्थिरावले आहेत. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ मालिकेपासून सुरुवात करून सध्या ‘झी मराठी’च्या ‘अलटी पलटी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला चेतन वडनेरे, ‘लव्ह लग्न लोच्या’ मालिकेतून लोकांसमोर आलेली सिद्धी कारखानीस असे अनेक कलाकार ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून पुढे आले आहेत. अनुभवी नाटय़कर्मीच्या उपस्थितीत राज्यभर रंगणारी ही स्पर्धा म्हणूनच नाटय़विश्वात अनोखी ठरली आहे.

तयारीला लागा..

मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी आणि नाशिक या आठ विभागांतून ही स्पर्धा घेण्यात येते. प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि त्यातून निवडल्या गेलेल्या राज्यभरातील आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी अशा चाळणीतून महाराष्ट्राची ‘लोकसत्ता लोकांकिका’ निवडण्यात येते. लवकरच या स्पर्धेच्या तारखा जाहीर होतील आणि त्यासोबतच प्रवेश अर्जही उपलब्ध होतील. त्यामुळे त्या तारखांकडे लक्ष ठेवता ठेवताच आपल्या एकांकिका निवडीसाठी महाविद्यालयीन रंगकर्मीनी तयारी करायला हवी.

प्रायोजक..  महाविद्यालयीन तरुणाईशी विश्वासाचे अतूट नाते जोडणाऱ्या ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी टॅलेंट पार्टनर म्हणून ‘आयरिस प्रॉडक्शन’ याही वर्षी सोबत आहे.