ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर आणि अभिनेते मकरंद देशपांडे यांचे प्रतिपादन

स्वतला व्यक्त करण्याचे माध्यम असते ते नाटक.. दुसऱ्यातील चांगले काय हे जाणून प्रसंगी त्याचे कौतुकही करण्याचा शहाणपणा अंगी बाणवते ते नाटक.. आपल्या मनातील न्यूनगंड काढून दूर फेकून देत आत्मविश्वासाने आपले विचार, कला मांडण्याची ताकद देते ते नाटक.. अशा नानाविध अर्थानी माणसाचे जगणे समृद्ध करणारी कला म्हणून या नाटय़कलेची आणि सकस नाटय़विचारांची जपणूक महत्त्वाची आहे, असा स्पष्ट विवेकी विचार ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर उमटला. स्वातंत्र्योत्तर काळानंतरचे सामाजिक बदल अंगावर घेत अभिनयाची वाट पक्की करताना रंगकर्मीच्या पिढय़ा घडविणारे ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या प्रगल्भ अनुभवांतून आणि कायम प्रयोगशीलतेचा आस धरणारे अष्टपैलू अभिनेते मकरंद देशपांडे यांच्याही विचारांतून नाटय़जाणिवांचा हा संस्कार सर्वसामान्यांकरीताही तितकाच महत्वाचाच असल्याचा सूर उमटला.

राज्यभरातील आठ केंद्रांवर चाललेल्या, सव्वाशेहून अधिक महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी यशवंत नाटय़मंदिरात पार पडली. महाविद्यालयीन तरूण कलावंतांचा सळसळता उत्साह, ‘हाऊसफुल’ गर्दी करून प्रेक्षकांनी त्यांना दिलेली दाद, नाटय़-चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याच्या चमकदारपणास दिलेली चंदेरी जोड अशा वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास अधिक रंगत आली ती वेगवेगळया पध्दतीने नाटय़विचार पुढे नेणाऱ्या सतीश आळेकर आणि मकरंद देशपांडे यांच्या खास उपस्थितीमुळे.

अंतिम फेरीत प्रेक्षकांची मनेजिंकून गेलेल्या आठ एकांकिकांनंतर या दोन प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित तरूण कलाकारांसमोर आपले अनुभवजन्य विचार मांडले. नाटकाचे वेड हे मराठी माणसाच्या रक्तात भिनलेले आहे. पण रंगमंचावरचे नाटक पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या मनात ते नाटक, त्यातील विचार झिरपणे जितके महत्वाचे आहे तितकेच नाटक करणाऱ्याच्या अंतर्मनातही तो विचार – मग तो सामाजिक असो, राजकीय असो – भिनणे गरजेचे आहे, असे मत सतीश आळेकर यांनी यावेळी मांडले.

महाअंतिम सोहळ्यात जिंकणार कोण, याची उत्सुकता मनात असतानाही टाळ्या-शिटय़ांच्या गजरात विचारांना दाद देणाऱ्या युवकांचा उत्साह आळेकरांना त्यांच्या स्पर्धाच्या दिवसांची आठवण करून देणारा होता. ते म्हणाले, ‘स्पर्धामधली ही उत्साही मनं म्हणजे मनाने मानी आणि माथ्याने संतापी अशी असतात. रंगमंचावर आपल्या अभिनयाने हे चतन्याचे क्षण उधळत असताना त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे, याचा प्रामाणिक शोधही आता या स्पर्धामधून पुढे जातानाच घेतला पाहिजे. आम्ही ज्यावेळी रंगभूमीवर प्रवेश केला तो काळ नेहरुंच्या आíथक धोरणांचा होता. नव्वदनंतर जे आíथक बदल घडले त्याचे परिणाम नाटय़कलेवरही झाले आहेत. ते बदल लक्षात घेऊन या पिढीने निर्णय घेतले पाहिजेत.

स्पर्धाच्या मांडवाखालून जाताना नाटकातील ही उर्जा भविष्यात जगण्याचे साधन म्हणूनही निवडायची आहे की नाही, याचाही विचार याचवेळी करायला हवा, हे सूत्र धरून मकरंद देशपांडे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. ‘अतिथी म्हणून ‘लोकांकिका’च्या माध्यमातून संवाद साधतानाही आपण अजूनही िवगेत आपल्या प्रवेशासाठी उभे आहोत, याची जाणीव जास्त प्रखर आहे,’ असे सांगतानाच, ‘एकांकिका स्पर्धा कलाकरांना शिस्त, आत्मविश्वास आणि व्यक्त करायला शब्द देतात. या स्पर्धामधून मिळालेले संचित करिअरच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला मदत करते. तुमच्या प्रतिस्पध्र्याकडील चांगले गुण आत्मसात करायची भीती बाळगू नका आणि अशा स्पर्धामधून बक्षीस घेताना पुढील वाटचालीसाठी एक दृष्टिकोन घ्या,’ असा मोलाचा सल्ला त्यांनी नाटय़गृहात जमलेल्या उद्याच्या रंगकर्मीना दिला.

रंगमंचावरचे नाटक पाहून बाहेर

पडलेल्या प्रेक्षकांच्या मनात ते नाटक, त्यातील विचार झिरपणे जितके महत्वाचे आहे तितकेच नाटक करणाऱ्याच्या अंतर्मनातही तो विचार, मग तो सामाजिक असो, राजकीय असो, भिनणे गरजेचे आहे.

– सतीश आळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी

एकांकिका स्पर्धा कलाकारांना शिस्त आणि आत्मविश्वास देतात. या स्पर्धामधून मिळालेले संचित करिअरच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला मदत करते. तुमच्या प्रतिस्पध्र्याकडील चांगले गुण आत्मसात करायची भीती बाळगू नका.

                       – मकरंद देशपांडे, अभिनेते