नाटय़वेडय़ा तरुणांच्या कल्पकतेचा आणि सृजनशीलतेचा कस लावणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचे शेवटचे दोन टप्पे ठाणे आणि मुंबईत १३ आणि १४ डिसेंबर रोजी पार पडणार आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या या विभागीय अंतिम फेरीसाठीच्या नि:शुल्क प्रवेशिका आज, गुरुवारपासून उपलब्ध होणार आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार या प्रवेशिकांचे वाटप केले जाणार आहे. ही स्पर्धा अस्तित्त्व संस्थेच्या सहकार्याने होत असून झी मराठी या स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकांकिका’ या स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी ठाण्यात १३ डिसेंबरला राम गणेश गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे.
तर मुंबई विभागाची अंतिम फेरी १४ डिसेंबरला दादर येथील सावरकर सभागृहात होईल. या दोन्ही अंतिम फेऱ्यांसाठीच्या विनामूल्य प्रवेशिका गुरुवारपासून उपलब्ध होतील.

प्रवेशिका ठिकाणे
ठाणे विभागाच्या अंतिम फेरीसाठीच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या ठाणे कार्यालयात उपलब्ध आहेत. तर मुंबई विभागाच्या अंतिम फेरीसाठीच्या प्रवेशिका सावरकर स्मारक सभागृहात गुरुवारी संध्याकाळी ५ ते ८.३० या वेळेत व शुक्रवारी सकाळपासून उपलब्ध असतील. प्रवेशिकांमार्फत त्या त्या केंद्रावरील पाच एकांकिका पाहता येणार आहेत.

रत्नागिरीत विभागीय अंतिम फेरीच्या निमित्ताने बुधवारी काढण्यात आलेली ‘लोकांकिके’ची नक्षीदार रांगोळी लक्ष वेधून घेत होती.