‘गंगाधर ही शक्तिमान है’ या हिंदी नाटकाचा शनिवारी प्रयोग

मुंबई : तरुणांच्या विचारांना आणि कल्पकतेला हक्कोचे व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत चमकलेले अनेक विद्यार्थी कलाकार पुढे जाऊन नाटय़ क्षेत्रात अभिनव प्रयोग करत आहेत. त्यापैकीच ऋषी मनोहर या पुण्यातील तरुणाने ‘गंगाधर ही शक्तिमान है’ या हिंदी नाटकाची निर्मिती केली आहे. विनोद आणि गूढ या दोन्ही बाजांना एकत्र करून साकारलेली ही कदाचित प्रायोगिक रंगभूमीवरील पहिलीच कलाकृती असेल.

दोन वर्षांपूर्वी लोकांकिका स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ‘सॉरी परांजपे’ या नाटकासाठी ऋषीला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपल्या काही मित्रांची मोट बांधून त्याने ‘आजकल’ या नाटय़ संस्थेची उभारणी केली. सध्या या संस्थेअंतर्गत विविध विषयांवरील नाटकांची निर्मिती तो करत आहे. ‘सॉरी परांजपे’, ‘इतिहास गवाह है’ यांसारख्या नाटकांमधून सामाजिक विषय मांडल्यानंतर रसिकांचे निखळ मनोरंजन करावे या हेतून ‘गंगाधर ही शक्तिमान है’ हे नाटक करण्यात आले आहे.  नाटकाचा बाज विनोदी असला तरी कथानक मात्र गूढ आहे. त्यामुळे प्रायोगिक नाटकांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले जाते. व्यावसायिक प्रमाणे प्रायोगिक नाटकांचेही प्रयोग मोठय़ा प्रमाणात व्हावे हा उद्देश या तरुणांनी बाळगला आहे.   प्रयोग १८ जानेवारीला रात्री ८.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे होईल. महाविद्यालयाचे पाठबळ असताना नाटक करणे सोपे असते, परंतु स्वत:ची संस्था उभारून प्रयोग करणे आव्हान आहे. हिंदी नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रासोबतच भारतभरात पोहोचण्याचा मानस आहे, असे दिग्दर्शक ऋषी मनोहर यांनी सांगितले.