नाटककार एलकुंचवार यांची उपस्थिती
राज्यभरातील आठ केंद्रांतून निवडण्यात आलेल्या आठ महाविद्यालयांच्या एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या अंतिम प्रयोगासाठी सज्ज झाल्या आहेत. नाटककार महेश एलकुंचवार यांची खास उपस्थिती आणि नाटय़वेडय़ांच्या गर्दीत आज, शनिवारी महाअंतिम सोहळा रंगणार असून त्याच्या प्रवेशिका हातोहात संपल्या आहेत.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘पृथ्वी एडिफिस’च्या सहकार्याने आयोजित आणि ‘केसरी’ पॉवर्ड बाय ‘लोकसत्ता लोकांकिका’ या तरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा शनिवारी, रवींद्र नाटय़मंदिर येथे होणार आहे. औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, नगर, नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाणे अशा आठ शहरांमध्ये झालेल्या या स्पर्धेतून प्रत्येकी एक अशा आठ एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
मुंबईची ‘एक्स्प्रिमेंट’, ठाण्याची ‘मित्तर’, नाशिकची ‘व्हॉट्स अॅप’, पुण्याची ‘जार ऑफ एल्पिस’, औरंगाबादची ‘भक्षक’, नगरची ‘ड्रायव्हर’, रत्नागिरीची ‘भोग’ की नागपूरची ‘विश्वनटी’ या आठ एकांकिका या फेरीत आहेत.
वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या या तरुण नाटककारांची ऊर्जा, त्यांचे विचार यांचा अनोखा नाटय़ाविष्कार पाहण्यासाठी दस्तुरखुद्द नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित राहणार आहेत. नाटय़विश्वात एलकुंचवार यांची प्रतिभा, त्यांची नाटके यांचे स्थान आगळे आहे. कुठल्याही चौकटी-रूढी न मानणाऱ्या या नाटककाराने ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगांत’, ‘वासनाकांड’ यांसारखी अभिजात नाटके दिली आहेत. आजच्या पिढीलाही विचार करायला लावणाऱ्या या अभ्यासू नाटककाराचे मार्गदर्शन, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा हे या सोहळ्याचे अनोखे आकर्षण ठरणार आहे.

रवी मिश्रा यांच्या ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहकार्य लाभले आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या कार्यक्रमाचे टॅलेण्ट पार्टनर तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत.

विनय आपटे स्मृती पुरस्कार
‘लोकांकिका’च्या पहिल्या पर्वापासून सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाला ‘विनय आपटे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. यंदाही हा पुरस्कार देण्यात येणार असून विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे यासाठी खास उपस्थित राहणार आहेत.

काय : महाअंतिम फेरी
कधी : आज, शनिवारी
कुठे : रवींद्र नाटय़मंदिर, वाजता : सकाळी १० पासून