महाविद्यालयीन तरुणाईचा सळसळता उत्साह, त्यांच्या नवनव्या कल्पना-संकल्पनांचा नाटय़ाविष्कार ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या व्यासपीठावर पाहायला मिळाला. तरुणाईच्या कल्पकतेने सजलेला हा ‘लोकसत्ता लोकांकिका’ सोहळा रविवार, १५ फे ब्रुवारी २०१५ रोजी ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
राज्यभरातील नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांना एक नवे आणि हक्काचे व्यासपीठ तयार करून mu14देण्यासाठी सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सौजन्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि रत्नागिरी अशा आठ शहरांमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा घेण्यात आली. महाअंतिम फेरीत पुण्यातील आय.एल.एस. महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’ ही ‘लोकांकिका’ ठरली. तर रत्नागिरीच्या डी.बी.जे. महाविद्यालयाची ‘कुबूल है’ आणि मुंबईतील म.ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘बीइंग सेल्फिश’ या दोन एकांकिका दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीचा हा थरार झी मराठी वाहिनीच्या ‘नक्षत्र’ या कार्यक्रमांतर्गत पाहायला मिळणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने आपल्या ‘नक्षत्र’ या कार्यक्रमांतर्गत मराठी नाटकांना विशेष स्थान दिले आहे. काही गाजलेली मराठी नाटके ‘नक्षत्र’च्या निमित्ताने दर रविवारी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न वाहिनीने केला आहे. याच कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन तरुणाईच्या कल्पकतेने नटलेल्या ‘लोकांकिका’ रविवारी, दुपारी १ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळतील. याचे पुन:प्रक्षेपण त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता केले जाणार आहे.