News Flash

श्रीगणेश, रंगदेवता आणि नाटय़रसिक..

‘श्रीगणेश, रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून लोकसत्ता सहर्ष सविनय सादर करत आहे. ‘

| December 23, 2014 01:52 am

‘श्रीगणेश, रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून लोकसत्ता सहर्ष सविनय सादर करत आहे. ‘लोकांकिका’.. दोन-तीन महिन्यांपूर्वी ही घोषणा ‘लोकसत्ता’मधून झाल्यापासून अवघ्या महाराष्ट्रभरातील महाविद्यालयांत एक वेगळाच उत्साह संचारला होता. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत हाच उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रभरातून महाअंतिम फेरीसाठी आलेल्या एकांकिकांमधील कलाकार, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले प्रेक्षक, या तरुण कलावंतांचा उत्साह वाढवण्यासाठी रवींद्र नाटय़ मंदिरात प्रकटलेले तारे-तारकादळ यांमुळे संपूर्ण शनिवार मंतरलेला होता. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची घोषणा झाल्यापासूनचे दोन महिन्यांचे मंतरलेपण या शनिवारमध्ये पुरेपूर उतरले होते.
शनिवार, २० डिसेंबर रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात सकाळपासूनच एक वेगळीच लगबग सुरू होती. मराठी नाटकांना प्रेक्षक नाही, हे वाक्य इतिहासजमा झाल्याची साक्ष पटवेल, अशी गर्दी सकाळी नऊपासूनच नाटय़गृहाबाहेर घुटमळत होती; तर रंगमंचावर पडद्यामागे नेपथ्य लावण्यासाठीची, प्रकाशयोजना योग्य पद्धतीने करण्यासाठीची चाललेली धडपड यांमुळे वातावरणात उत्साह संचारला होता. बरोबर दहाच्या ठोक्याला परीक्षक शफाअत खान, विजय केंकरे, अशोक मुळ्ये, चंद्रकांत कुलकर्णी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले आणि तिसऱ्या घंटेनंतर महाअंतिम फेरीतील पहिली एकांकिका सुरू झाली. म. ल. डहाणुकर महाविद्यालयाची ‘बीइंग सेल्फिश’!
एकांकिका स्पर्धामध्ये साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या एकांकिकांनंतर प्रेक्षागारात गर्दी जमायला सुरुवात होते. मात्र ‘लोकसत्ता लोकांकिका’ची महाअंतिम फेरी ही या अनुभवाला चांगलाच अपवाद ठरली. पहिल्या एकांकिकेपासूनच प्रेक्षागारातील सर्वच खुच्र्या भरल्या होत्या. ३० नोव्हेंबरपासूनच राज्यभरात सुरू झालेल्या या स्पर्धेत हा अनुभव कायम होता. काही वर्षांपूर्वी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये दुसऱ्या महाविद्यालयाची एकांकिका ‘पाडायची’ या उद्देशाने अनेक ‘सीनिअर्स’ प्रेक्षकांमध्ये बसून हुल्लड करायचे. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये ही बाब सर्रास दिसायची. मात्र दुसऱ्या महाविद्यालयांच्या एकांकिकांमधील उत्तम वाक्ये, दिग्दर्शनातील उत्कृष्ट जागा, कलाकारांचा अभिनय, समर्पक संगीत नियोजन यांना मनापासून टाळ्या वाजवून दाद देणारी तरुणाई ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाली.
महाअंतिम फेरीत सादर झालेली दुसरी एकांकिका म्हणजे नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालयाची ‘हे राम’! बोहाडा या लोककला प्रकारावर आधारित या एकांकिकेमधील लोककला प्रकाराच्या मांडणीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिसरी एकांकिका ‘कोंडवाडा’ अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या कलाकारांनी सादर केली. वेश्या व्यवसाय हा विषय या महाविद्यालयाने सादर केला. त्यानंतर सादर झालेल्या ‘मसणातलं सोनं’ या एकांकिकेतील कलाकारांनी आपल्या लयबद्ध अभिनयाने प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. संगीत आणि अभिनय यांची जुगलबंदी या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाने सादर केलेल्या या एकांकिकेसाठी त्यांना संगीताचे पारितोषिकही मिळाले. ‘सिग्मंड फ्रॉइड’ या मानसोपचारतज्ज्ञाच्या अभ्यासावर आधारित एकांकिकेच्या मांडणी व लेखनाला प्रेक्षकांनी दाद दिली. ओंकार भोजने या तरुण लेखकाला या एकांकिकेसाठी पारितोषिक मिळाले.
प्रेक्षकांमध्ये कुतुहल असलेली आयएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’ या महाअंतिम फेरीत सादर झालेली सहावी एकांकिका! सहजसुंदर अभिनय, सुलभ मांडणी आणि देखणेपणा यामुळे या एकांकिकेने प्रेक्षकांच्या टाळ्या आणि हशा पुरेपूर वसूल केल्या. पारितोषिक वितरण समारंभात याच एकांकिकेला ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ हा किताब मिळाला, तेव्हा परीक्षकांनाही ही एकांकिका आवडल्याची पावती मिळाली. नागपूरच्या एल. ए. डी. कॉलेजने सादर केलेली ‘बोल मंटो’ ही एकांकिका सआदत हसन मंटो या उर्दू कथाकार आणि लेखकाच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकणारी होती. शेवटी सादर झालेली उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाची ‘मडवॉक’ ही एकांकिका गौतम बुद्ध आणि त्याचे तत्त्वज्ञान यांचा वेगळा विचार करायला लावणारी होती.

llk05
पुण्यातील आय.एल.एस. विधी विद्यालयाच्या ‘चिठ्ठी’ एकांकिकेला ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते सवरेत्कृष्ट लोकांकिकेचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. ‘सॉफ्ट कॉर्नर’चे डी. एस. कुलकर्णी, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदी यावेळी उपस्थित होते.

आमच्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले, याचा आनंद आहेच, पण पारितोषिक आम्हाला खुद्द विजया मेहता यांच्या हस्ते मिळाले याचा जास्त आनंद आहे. आज घरी परतताना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप छान आठवणींचे गाठोडे घेऊन जाणार आहोत. आज बक्षीस जिंकल्यावर सर्व जग जिंकल्यासाखं वाटतं आहे.
– अर्पिता घोगरदरे, चिठ्ठी, आय.एल.एस. विधी विद्यालय, पुणे

llk04
चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या ‘कबुल है’ एकांकिेकेला ‘सॉफ्ट कॉर्नर’चे डी.एस. कुलकर्णी यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होते, ते म्हणजे चिपळूणसारख्या छोटय़ा शहरातून येऊनही मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील एकांकिकांना टक्कर देणे. अशा प्रकारच्या एकांकिका स्पर्धामध्ये मुंबई-पुण्याच्या महाविद्यालयांचे वर्चस्व असते. ती प्रथा मोडून या स्पर्धेने आम्हालाही आमचे कौशल्य दाखवण्याची संधी दिली.
– महेश कापरेकर, कबूल है,डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण

 

llk02
मुंबईतील एम. एल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘बिइंग सेल्फीश’ या एकांकिकेला ‘केसरी टुर्स’चे अध्यक्ष केसरी पाटील आणि ‘एक्सप्रेस समूहा’चे
वरिष्ठ उपाध्यक्ष (वितरण) सुनील नायर यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

आज महाराष्ट्रातून तिसरे आलो, याचा आनंद सर्वात जास्त आहे. सोप्पी मांडणी आणि नेमक्या शब्दात विषय मांडण्याकडे आमचा कल होता आणि लोकांपर्यंत त्यातील नेमके सार पोहचले. एकांकिका संपल्यावर अनेकांनी आम्हाला भेटून त्याबद्दल सांगितलेही. त्यामुळे आमचा उद्देश सफल झाला.
– पराग ओझा, बिइंग सेल्फिश, एम.एल.डहाणूकर महाविद्यालय, मुंबई

 

विजेत्यांचे बोल
एखाद्या एकांकिकेला प्रकाशयोजना करण्याचे हे माझे पहिलेच वर्ष आहे, त्यामुळे त्यासाठी पारितोषिक मिळणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खूप शिकायला मिळाले. मुख्य म्हणजे इतर स्पर्धाच्या दरम्यान प्रचंड घाईगर्दी केली जाते आणि गोंधळाचे वातावरण असते, पण इथे तसे काही नव्हते. प्रत्येकाने आपलेपणाने मदत केली.
– नृपाल डिंगलकर,
सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना : ‘चिठ्ठी’

lk02
‘अस्तित्त्व’चे रवी मिश्रा यांचे स्वागत ‘एक्सप्रेस वृत्तसमूहा’चे वरिष्ठ उपाध्यक्ष (वितरण)  सुनील नायर यांनी केले.

पारितोषिक मिळणार यावर विश्वास होताच, पण तरीही आज पारितोषिक मिळाल्याचा आनंद वेगळाच आहे. सेट उभारताना शक्य तितका साधेपणा ठेवायचा, हा मंत्र आम्ही पाळला होता. आम्हाला एका गावाचा देखावा उभारायचा होता. त्यामुळे सेटवर सर्व गोष्टींचा पसारा करण्यापूर्वी अनावश्यक गोष्टी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.  
– रेणुका जोशी,
सवरेत्कृष्ट नेपथ्य : ‘चिठ्ठी’

आमचं नाटक आता सर्वांपर्यंत पोहोचतंय याचा आनंद जास्त आहे. विषयाच्या निवडीपासून ते नाटक इथपर्यंत आणण्यापर्यंत विविध लोकांनी भरपूर मेहनत घेतली होती. त्या मेहनतीचे चीज आज झाले असे वाटते आहे. दिग्दर्शनासाठी पारितोषिक मिळाल्याचा आनंद आहेच, पण सगळ्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते. माझ्या टीममधील प्रत्येकाने पूर्ण मदत केली होती.
– अपूर्वा भिलारे,
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक : ‘चिठ्ठी’

आमच्या एकांकिकेमधून आम्हाला बुद्धाची विचारसरणी लोकांपुढे मांडायची होती, पण ते करताना शक्य तितक्या सोप्या पद्धतीने विषयाची मांडणी करण्याकडे आमचा भर होता. हा विचार लोकांपर्यंत पोहोचला याचा जास्त आनंद आहे. मला यापुढेही अभिनयातच माझी कारकीर्द करायची आहे. त्या दृष्टीने हे बक्षीस माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.     
– अभिजीत पवार,

सवरेत्कृष्ट अभिनेता : ‘मडवॉक’

आम्ही या एकांकिकेचे प्रयोग वेगवेगळ्या स्पर्धामध्ये करीत आहोत. ‘लोकांकिके’च्या माध्यमातून मुंबईमध्ये ही एकांकिका सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याचा आनंद सर्वात जास्त आहे. माझे काम इतक्या मोठय़ा मंचावर, दिग्गज आणि मोठय़ा प्रेक्षकवर्गासमोर सादर करण्याची संधी मला मिळाली, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.    – अर्पिता घोगरदरे,
सर्वोत्कृष्ट अभिनय : ‘चिठ्ठी’
मराठवाडय़ासारख्या शहरातून येऊन मुंबईमध्ये एकांकिका सादर करायला मिळाली, याचा आनंद जास्त आहे. येथे नाटय़क्षेत्रातील मान्यवरांसमोर
एकांकिका सादर करता आली, त्यांच्या सूचना ऐकायला मिळाल्या, हे सर्व आमच्यासाठी महत्त्वाचे होते. पारितोषिक मिळणे म्हणजे आमच्या कामाची पोचपावतीच आहे, असे वाटते. पण नेमक्या याच क्षणी आमचा मित्र भरत त्याचे हे पारितोषिक स्वीकारायला आणि आनंदात सहभागी होण्यासाठी येथे उपस्थित नाही, याचे दु:खही आहे.
– रावसाहेब गजमल
(भरत जाधवच्या वतीने),
सवरेत्कृष्ट संगीत : ‘मसणातलं सोन’

llk01
‘कबुल है’  या एकांकिकेसाठी ओंकार भोजने याला ‘लोकसत्ता’चे रवींद्र पाथरे यांच्या हस्ते सवरेकृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रताप मोहोंती, चंद्रकांत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

वैचारिक प्रबोधन हा आमच्या एकांकिकेचा मूळ गाभा होता. मी स्वत: मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्यामुळे ‘सिग्मंड फ्रोइड’ यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. ते विचार माझ्या लेखणीतून आणि पात्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याची पोचपावती म्हणून हा पुरस्कार घेताना मला आनंद होतोय. ‘लोकसत्ता’ने हा आम्हाला एक मोठा मंच दिला होता आणि आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचा आनंद जास्त आहे.
– ओंकार भोजने,
सवरेत्कृष्ट अभिनेता,  सवरेकृष्ट लेखन : ‘कबूल है’

परीक्षकांकडून कौतुक
नवे व्यासपीठ..
 wn01युवकांच्या ताकदीला ऊर्जा देण्याचे काम ‘लोकसत्ता’ने लोकांकिकेच्या माध्यमातून केले आहे. हे नवे व्यासपीठ मुलांचा उत्साह वाढवणारे आहे. संपूर्ण लोकांकिका महाअंतिम स्पर्धा चांगले विचार प्रवाहित करणारी अशीच होती. तरुणाईची ऊर्जा मी समजू शकते आणि त्यांच्या या ऊर्जेला एक विधायक रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुलांना पुढे येण्याची नक्कीच चांगली संधी मिळेल.
– मधुगंधा कुलकर्णी, लेखिका, अभिनेत्री

अभिनव कल्पना..
wn02ही स्पर्धा पाहणे माझ्यासाठी प्रेरणादायी असून काही वर्षे मागे नेणारी ही स्पर्धा आहे. महाअंतिम फेरीला विविध विभागांतील सवरेत्कृष्ट एकांकिका येथे आल्या असून त्यामुळे जे सवरेत्कष्ट आहे तेच आम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तरुणाईची अभिनय शैली, विषय पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न हे रंगभूमीसाठी आशादायक चित्र आहे.
– विजय केंकरे, ज्येष्ठ नाटककार

‘लोकसत्ता’ मागे उभा आहे हे महत्त्वाचे..
wn03राज्यभर एकांकिका स्पर्धाचे आयोजन होत असले तरी लोकांकिका स्पर्धेच्या मागे ‘लोकसत्ता’सारखे अत्यंत नावलौकिक प्राप्त वृत्तपत्र उभे आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यातील विविध प्रादेशिक भागातून या लोकांकिका आल्याने त्या त्या भागातील विषय, दिशा आणि तेथील विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, त्यानुसार विषयांची मांडणी या स्पर्धेत दिसून आली. राज्यातील सर्व भागांतील दर्जेदार एकांकिका येथे पाहायला मिळाल्या.  
प्रदीप मुळे, ज्येष्ठ नेपथ्यकार

प्रायोजकांकडून शाबासकी
wn05महाराष्ट्राला सांस्कृतिक क्षेत्रामधील सुपरस्टार्स हे एकांकिका स्पर्धामुळेच लाभले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा उपक्रम ‘लोकसत्ता’ने आयोजित करणे, हे उत्तमच आहे. त्याचबरोबर, माध्यमाकडून जेव्हा अशाप्रकारचा उपक्रम आयोजित केला जातो, तेव्हा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यात मदत होते. मुलांनी सादर केलेल्या एकांकिकांमध्ये कुठेही साचेबद्धता नव्हती. त्यांना आजच्या काळात वावरताना जाणवणाऱ्या समस्यांचे चित्रण त्यांनी केले होते.  – डी.एस.कुलकर्णी, सॉफ्ट कॉर्नर,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

wn06‘लोकांकिका’ हा उपक्रम देशभर पोहचला, तर याचे पूर्ण श्रेय ‘लोकसत्त’ला जाईल आणि लोकसत्ताच्या माध्यमातून हा उपक्रम देशभरात पोहचावा अशी आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. अंतिम फेरीमध्ये सर्वच मुलांनी उत्तम कामगिरी केली. परीक्षकांनी निवडलेल्या एकांकिका उत्तम होत्या यात वाद नाहीच, पण ज्या एकांकिका एक-दोन गुणांनी मागे राहिल्या त्याही उत्तमच होत्या.
– केसरी पाटील, केसरी टुर्स प्रा.लि., अध्यक्ष

wn07महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे विविध विभागांतील महाविद्यालयीन मुलांना सहभागी होता आले. त्यामुळे स्पर्धेची व्याप्ती वाढली.
– प्रताप मोहोंती, बँक ऑफ महाराष्ट्र,
उप महाव्यवस्थापक आणि विभागीय प्रमुख

लोकसत्ताने तरुण वाचकांमध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर जागरुकता करण्यामध्ये सतत प्रयत्न केला आहे. त्याचसोबत सांस्कृतिक भान ठेवण्यासाठी अशाप्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे.  कोणत्याही घटनेवर मत व्यक्त करण्यामध्ये तरुण पिढी नेहमीच अग्रेसर असते. अशावेळी या तरुणांना व्यक्त होण्यासाठी एकांकिका हे एक उत्तम माध्यम आहे. तरुणांच्या विचारांना वाचा फोडण्याचे मुख्य काम एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून होत असते आणि म्हणूनच असे प्रयोग भविष्यात माध्यमांकडून सातत्याने होणे गरजेचे आहे.
दीपक राजाध्यक्ष, झी मराठी, बिझनेस हेड

मान्यवरांचे  मनोगत
विचार आणि मांडणीत खरेपणा
 lok01    ‘लोकसत्ता’चा ‘लोकांकिका’ हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. यामुळे आजची पिढी नक्की काय आणि कसा विचार करते आहे, हे पाहायला मिळाले. अंतिम फेरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागांतून निवडून आलेल्या उत्तमोत्तम एकांकिका पाहण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये मुलांनी निवडलेले विषय, त्यांची मांडणी हे सर्व पाहता आजची पिढी विचारांच्या दृष्टीने किती पुढे गेली आहे, हे दिसून आले.
 – सुलभा देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री

कारकीर्दीचे प्रवेशद्वार   
lok2राज्यभरातून आलेल्या एकांकिका मुंबईमध्ये एकाच मंचावर पाहायला मिळाल्या. अशा स्पर्धाच्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून मध्यमवर्गातील लोकांची संख्या जास्त दिसते; पण या वेळी मात्र तरुणांनी आवर्जून या स्पर्धेला हजेरी लावली होती.
– अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवी

वर्तमानपत्राचा पाठिंबा महत्त्वाचा
lok3महाराष्ट्राभर वेगवेगळ्या पातळ्यांवर एकांकिका स्पर्धा होतच असतात; पण ‘लोकसत्ता’सारख्या वर्तमानपत्राने ‘लोकांकिका’सारखी स्पर्धा आयोजित करणे महत्त्वाचे आहे, कारण वर्तमानपत्राच्या माध्यमातून असे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचतात. आजच्या पिढीचे विषय, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ते व्यक्त होताना व्यावहारिकदृष्टय़ा विचार करतात, हे यानिमित्ताने जाणवले.  – अजित भुरे, अभिनेते

कार्यशाळांच्या आयोजनाची गरज
lok4मुलांनी विविध गोष्टींचे नाटय़रूपांतर केले होते, हा प्रकार जास्त भावला. मुलांची धडपड, त्यांची मेहनत पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. मुलांचे लेखन परिपक्व आहेच; पण त्यावर अजूनही संस्कार होण्याची गरज आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे.  
– मीना नाईक, नाटय़ अभ्यासक

lok5खूप काही घेण्यासारखं
या एकांकिकांच्या माध्यमातून सादर होणाऱ्या सर्वच एकांकिका सामाजिक संदेश देणाऱ्या तर होत्याच, शिवाय खूप काही शिकवणाऱ्या अशाच होत्या. त्यामुळे प्रत्येक एकांकिकेतून घेण्यासारखे खूप होते.
– रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

lok6दर्जेदार बनवण्यासाठी प्रयत्न आवश्यक
एकांकिका चांगल्या आहेत, मात्र त्यांच्यामध्ये अजूनही चांगले करण्यासारखे खूप काही आहे. चटपटीत वाक्यांमध्ये गुंतून पडण्यापेक्षा अधिक दर्जेदार बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
– परेश मोकाशी, दिग्दर्शक

नवीन पिढी घडण्यास मदत
या स्पर्धेच्या निमित्ताने एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून केवळ अभिनेतेच नाहीत; पण नेपथ्य, संगीत, लेखन, दिग्दर्शन अशा विविध अंगांची नाटकाची नवीन पिढी घडण्यास मदत होणार आहे. माझ्या आगामी नाटकाची प्रकाशयोजनेची जबाबदारी ‘लोकांकिका’च्या मुंबई विभागातील एका एकांकिकेमध्ये प्रकाशयोजना केलेल्या तरुणावर सोपवली आहे.          
– प्रसाद कांबळी, निर्माता

‘सवाई’च्या तोडीच्या एकांकिका
आत्तापर्यंत दर्जेदार एकांकिका पाहायच्या असल्यास ‘सवाई’चे नाव आदराने घेतले जात होते. आत्ता यापुढे सवाईच्या तोडीच्या एकांकिका पाहायच्या असतील, तर प्रेक्षक निश्चितच ‘लोकसत्ता’च्या ‘लोकांकिके’चा उल्लेख करतील.  – प्रथमेश परब, ‘टाईमपास’ फेम अभिनेता

चांगले कलाकार आणण्याचे काम
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करून तेथील चांगले कलाकार हे मुंबईच्या नाटय़सृष्टीच्या ‘मार्केट’मध्ये घेऊन येण्याचे काम लोकांकिकेच्या माध्यमातून झाले आहे. ही स्पर्धा अशीच कायम सुरू राहिली, तर ती रंगभूमीच्या विकासाचे रंगपीठ ठरेल.
– प्रेमानंद गज्वी, नाटककार
संकलन : रोहन टिल्लू, मृणाल भगत, श्रीकांत सावंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2014 1:52 am

Web Title: loksatta lokankika one act play competition highlight
Next Stories
1 तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत
2 केंद्राच्या निकषांचा २५ लाख विद्यार्थ्यांना फटका
3 शेकडो इमारती कारागृहाच्या जाळय़ात!
Just Now!
X