नवा आशय, नवे कलाकार, नवे लेखक, नव्या एकांकिकांची शोधयात्रा कधी, कुठे आणि कशी सुरू होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरात ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बिगूल वाजला असून उद्या, रविवारी प्रत्यक्ष प्राथमिक फेऱ्यांना दणक्यात सुरुवात होणार आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’ व ‘एलआयसी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी पुण्यात होणार आहे.
राज्यभरातील नाटय़वेडय़ांना साद घालणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या चुरशीच्या स्पर्धेची आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवर ‘लोकांकिका’च्या एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत.
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत आठ प्रमुख शहरांमधून एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या पाडणार आहेत. रविवारी पुण्यात ‘लोकांकिका’ची पहिली फेरी पार पडेल. त्यानंतर एकेक करत सर्व केंद्रांवरच्या प्राथमिक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ‘लोकांकिका’चा दुसरा अंक विभागीय अंतिम फेऱ्यांच्या निमित्ताने ७ ते १४ डिसेंबरदरम्यान या प्रत्येक केंद्रावर रंगेल. ‘लोकांकिका’ स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राज्यभरातील नाटय़वेडय़ांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. आता वेळ आहे ती प्रत्यक्ष नाटय़ाविष्काराची. नव्या दमाचे हे कलाकार ठिकठिकाणच्या केंद्रांवर आपापल्या एकांकिका सादर करतील. सादर झालेल्या एकांकिकांमधून परीक्षकांनी निवडलेल्या एकांकिका विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. या फेरीतून सवरेत्कृष्ट ठरलेल्या एकांकिकांमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा रंगेल आणि सवरेत्कृष्ट ‘लोकांकिका’ रसिकांसमोर येईल. ‘अस्तित्व कलामंच’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाना आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.