रविवारी ‘झी युवा’ वर प्रक्षेपण

मुंबई : महाविद्यालयीन तरुणांमधील उर्जेला, कलागुणांना वाव देणाऱ्या आणि भावी रंगकर्मी घडविणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पाहण्याची संधी पुन्हा प्रेक्षक आणि नाटय़रसिकांना मिळणार आहे. २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता या कार्यक्रमाचे झी युवा वाहिनीवर प्रसारण होईल. लोकसत्ता लोकांकिका-२०१७ ची महाअंतिम फेरी १६ डिसेंबर २०१७ रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात पार पडली होती.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि झी युवा, केसरी, पितांबरी सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.  प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री ज्योती सुभाष, अभिनेते राजन ताम्हाणे यांनी महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सॉरी परांजपे या एकांकिकेला महाराष्ट्राची ‘लोकसत्ता लोकांकिका’ होण्याचा बहुमान मिळाला होता. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नृत्यविभाग, औरंगाबाद महाविद्यालयाने सादर केलेली ‘माणसं’ आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग-कोल्हापूर यांनी सादर केलेल्या ‘डिफेन्स स्टेटस’ यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला होता. राज्यभरातील आठ केंद्रांमधून प्राथमिक, विभागीय अंतिम फेरीतून आठ दर्जेदार एकांकिका महाअंतिम फेरीत सादर झाल्या होत्या.