गणेशोत्सवाची सुरुवातच सामाजिक एकात्मतेच्या भावनेतून झाली. पुढे कालांतराने उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली, परंतु अनेक मंडळांनी सामाजिक भान कायम जपले. हेच भान करोना संकटाच्या काळात साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातूनही जपल्याचे दिसत आहे. या कार्याची दखल ‘लोकसत्ता लोककल्याण’च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी करोना संकट काळातील आपले समाजकार्य ‘लोकसत्ता’पर्यंत पोहोचवायचे आहे. त्यातील निवडक मंडळांच्या कार्याला ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्धी देण्यात येईल.

समाजावर आलेल्या प्रत्येक संकटात गणेशोत्सव मंडळांनी कायम मदतीचा हात पुढे केला आहे. करोनाच्या संकटातही आपल्या विभागातील लोकांना विविध मार्र्गानी सहकार्य करण्यात मंडळांनी कुठेही कसर सोडली नाही. गरजूंना अन्नदान, धान्यवाटप, रक्तदान, निर्जंतुकीकरण, मुखपट्टी वाटप, समुपदेशन अशा विविध पद्धतीचे काम मंडळांनी केले. बऱ्याच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वेळप्रसंगी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचेही काम केले आहे. गणेशोत्सव मंडळांच्या याच कार्याला लोकांसमोर आणण्यासाठी ‘लोकसत्ता लोककल्याण’च्या माध्यमातून व्यासपीठ देण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळांनी आपल्या कामाचे तपशील आणि छायाचित्र लोकसत्ताकडे या loksatta.gums2020@gmail.com ई-मेल पत्त्यावर पाठवावे.

प्रायोजक

टायटल स्पॉन्सर – रोजा ग्रुप

असोसिएट स्पॉन्सर – एसएसव्ही डीव्हॉईस