‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम फेरीसाठी विद्यार्थ्यांची लगबग

एकांकिकेचे सादरीकरण प्रभावी करण्यासाठी नेपथ्याचा वापरही खुबीने करावा लागतो. एकांकिकेच्या पृष्ठभूमीवरील नाटय़ ठसठशीतपणे उमटवण्यासाठी नेपथ्यही आकर्षक असावे लागते. त्यामुळेच ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत पोहोचलेल्या महाविद्यालयांचे विद्यार्थी नेपथ्याच्या साहित्याचीही शोधाशोध करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत हाताशी फारशी आर्थिक रसद नसल्याने गॅरेजमधील टाकाऊ सामान, भंगारवाला, किराणा दुकानदार यांच्याकडून जमा केलेल्या वस्तू किंवा भंगारातील जुन्या गाडय़ा यांचा वापर करून ही मुले नेपथ्य उभे करत आहेत.

एकांकिकेसाठी विषय ठरून तालमींना सुरुवात झाली की आधी ठरते ते नेपथ्य. महाविद्यालयातून एकांकिकांना दिली जाणारी रक्कम तुटपुंजी असल्याने नेपथ्य साकारताना आर्थिक गणित सोडविणे हा मोठा प्रश्न असतो. येथे विद्यार्थी स्वत:ची कल्पकता वापरून व्यवस्था करतात. कधी मिनतवाऱ्या करून तर कधी चक्क चोरून वस्तू जमा केल्या जातात. तर कधी टाकाऊ  वस्तूंना नवा आकार दिला जातो. यामुळे कमी खर्चात रेखीव नेपथ्य साकारण्याबरोबरच त्यातले प्रायोगिकत्वही टिकून राहते.

नेपथ्याचे हे किस्से मुंबईच्या विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडूनही ऐकायला मिळतता. नेपथ्य साकारणारा देवाशीष भरवडे सांगतो, रुईया महाविद्यालयातील ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ या एकांकिकेकरिता रंगमंचावर खऱ्या दुचाकी आणण्याचे आव्हान होते. त्यासाठी सोसायटीच्या आवारातील जुन्या टाकून दिलेल्या गाडय़ा उचलण्यात आल्या. एकांकिकेतील दशक्रिया विधीसाठी नदीचा घाट साकारताना लाकडी फळ्यांचा वापर करण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान मखराकरिता वापरण्यात आलेल्या अनेक टाकाऊ वस्तूंपासून बुद्रुकवाडीच्या मारुतीचे मंदिर साकारले आहे. एकांकिकेची सुरुवात एका जीपमधून होते. तिचे दिवे, स्टेअरिंग गॅरेजमधील टाकाऊ वस्तूंपासून बनले आहे. साठय़े महाविद्यालयाच्या ‘भूमी’ एकांकिकेत सरकारी घर आणि दुसऱ्या दृश्यात भोंडा समाजाच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण आले आहे.  ग्रामीण जीवन दाखवण्यासाठी पुठ्ठय़ांचे आणि गोण्यांचे डोंगर क रण्यात आले. त्यासाठी भंगारवाला, किराणावाला यांना गळ घालून या वस्तू जमा केल्या. भोंडा समाजातील हत्यारासाठी मोठय़ा प्रमाणात रद्दी वापरली गेली.

कीर्ती महाविद्यालयाच्या ‘ठसका’मध्ये नेपथ्यकार सिद्धेश नांदलस्कर सांगतो, आमची एकांकिका एसटी डेपो आणि बसमध्ये घडते. त्यातली दृश्ये साकरण्यासाठी लाकडी पट्टय़ांचा मोठा वापर करण्यात आला. ते आम्ही महाविद्यालयाच्या आवारात, रस्त्यावरून जमा केले. तसेच होर्डिगमधून निकामी झालेले लाकूड विविध ठिकाणांहून गोळा के ले.

महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘अर्धविराम’ एकांकिका ग्रामीण जीवनावर आधारलेली असल्याने गावाकडचे घर आणि परिसर महाविद्यालयातील वस्तूंचाच वापर करून साकारले गेले. आर्थिक बाजू थोडी कमकु वत असल्याने रंगमंचावर झाड उभे करणे अशक्य होते. म्हणून केवळ झाडाची एक फांदी तयार करून, तिला विंगेत अशा प्रकारे उभी केली की, प्रेक्षकांना त्या दृश्यात खरे झाड असल्याचा अनुभव येतो, असे नेपथ्यकार उज्ज्वल कानसकर सांगतो. तृतीयपंथी समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या या एकांकिके त नेपथ्यात विद्यार्थ्यांनी गुलाबी आणि निळ्या रंगांचा खुबीने वापर केला आहे. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेत चाळ संस्कृतीचे दर्शन घडते. ते घडवणारा केतन दुधवडकर सांगतो, स्वत: चाळीत राहत असल्याने काय दाखवायचे हे स्पष्ट होते. रस्त्यावरील बॅनरचा आणि लाकडी पट्टय़ांचा वापर केला. यात वापरले गेलेले शिलाईयंत्र माहितीतील एका काकूंचे आहे. या शिवाय भंगारातून अनेक वस्तू आणून त्यांना नवीन स्वरूप देण्यात आले.

थोडक्यात, नाटकाला जिवंत करणारे नेपथ्य साकारताना पैशाची जुळणी हे आव्हान असते. त्यासाठी नाना प्रकारचे जुगाड करून नेपथ्याला सजीव केले जाते. कारण प्रेक्षकांना जे दाखवायचे आहे त्यात विद्यार्थी तडजोड करायला तयार नसतात.