मुंबई : मराठी एकांकिका स्पर्धाच्या वर्तुळात मानाचे स्थान निर्माण केलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्याचे प्रक्षेपण शनिवार, २५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता ‘झी टॉकीज’वर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील एकांकिकांची परंपरा सक्षमपणे पुढे नेणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या सहाव्या पर्वाची महाअंतिम फेरी २१ डिसेंबर २०१९ रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात जल्लोषात पार पडली.

ठाणे, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई आणि पुणे अशा आठ विभागांमध्ये अव्वल ठरलेल्या एकांकिकांच्या एकाहून एक सरस सादरीकरणाने महाअंतिम फेरी रंगली. सामाजिक, कौटुंबिक विषय, विद्यार्थ्यांचे प्रश्न, स्त्री-जाणिवा, प्रेमकथा, पर्यावरण असे विविधांगी विषय या माध्यमातून रंगमंचावर अवतरले. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा सोहळा ‘झी टॉकीज’वर पाहण्याची संधी रसिकांना शनिवारी मिळणार आहे.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडली. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के . घारे ज्वेलर्स’ पॉवर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर होते. ‘झी टॉकीज’ या स्पर्धेसाठी प्रक्षेपण भागीदारही आहे. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर होते.