महाभारताची कालनिश्चिती करणारं नवं संशोधन, मनोरंजनाच्या क्षेत्रातले विविध ट्रेण्ड्स मांडणारे लेख, स्टार्टअपच्या विश्वाचा घेतलेला वेध, सिनेमा-नाटकाच्या क्षेत्रातल्या आणि प्रत्यक्षातल्याही लोकप्रिय जोडीची दिलखुलास मुलाखत, व्यवस्था बदलायला भाग पाडणाऱ्या शिलेदारांची व्यक्तिचित्रे असा भरगच्च मजकूर असलेला ‘लोकप्रभा’चा वर्धापनदिन विशेषांक नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
महाभारत हे महाकाव्य की इतिहास या चर्चेला नवे आयाम देणारं, महाभारताच्या नेमक्या काळासंबंधीच्या वेगवेगळ्या अभ्यासांना नवी दिशा देणारं आणि महाभारताची नव्याने कालनिश्चिती करणारं एक महत्त्वाचं संशोधन सध्या आकार घेत आहे. त्याविषयी डॉ. मधुकर केशव ढवळीकर आणि डॉ. अरविंद जामखेडकर या पुरावेत्त्यांचं विश्लेषण या अंकात आहे. पोस्ट प्रोसेस्युएल आर्किऑलॉजी, भाषाशास्र, शीलालेख या सगळ्यांचा आधार घेत, दंतकथा, पुराणांमधल्या भाकड गोष्टी गाळून त्यातल्या गाभ्याचा वापर करत महाभारताचा काळ निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून आर्य आणि सिंधु संस्कृतीतीले लोक वेगळे नव्हते, तर एकच होते, संस्कृतपूर्वीही प्राकृत भाषा व अपभ्रंश किंवा प्राकृतचीही प्राकृत असलेली अशी मूळ भाषा अस्तित्वात असावी, असे पुरावेही संशोधकांना सापडले आहेत. या संशोधनातून अनेक नव्या गोष्टी उघड होत असल्यामुळे यापूर्वीच्या अनेक गृहितकांना धक्के बसण्याची शक्यता आहे. यूटय़ूबवर असलेलं टेड टॉक्स हे वसंत व्याख्यानमालांचंच आधुनिक, व्यापक रुप कसं आहे, याचा मागोवा मुकुंद संगोराम यांनी घेतला आहे. तर डॉ. मीनल कातरणीकर यांनी प्रेमाची गुढी उभारण्याची, त्यासाठी आपल्या आसपासच्या समाजांविषयी संवेदनशील होण्याची चर्चा केली आहे.
छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरच्या जोडय़ा नेहमीच प्रेक्षकांच्या कुतुहलाचा विषय असतो. त्यात वास्तवातही ते जोडीदार असतली तर त्यांचं प्रेम, त्यांचं लग्न, त्यांचं नातं हे सगळंच कवतुकाचा विषय असतो. अवखळ प्रिया बापट आणि शांत, संयत उमेश कामत ही स्वभाव, वागण्याबिगण्याच्या बाबतीत दोन टोकांवर असलेली आणि तरीही ‘क्युट’ अशी जोडी आपल्या नात्याविषयी, त्यातल्या विविध कंगोऱ्याविषयी बोलती झाली आहे, चैताली जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत.
भविष्याच्या हाकांना साद देणाऱ्या तरुणाईचा वेध ‘लोकप्रभा’च्या दर अंकात घेतला जातो. वर्धापनदिनाच्या अंकात तो घेताना उद्याचा महत्त्वाचा नाटककार निपुण धर्माधिकारी आणि महत्त्वाचा लेखक, गीतकार, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन या दोघांशी अनुक्रमे ऋतुजा फडके आणि वरद लघाटे यांनी संवाद साधला आहे. आज सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप’च्या नाऱ्यामध्ये उद्याच्या उद्योगजगताचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता कशी आहे, त्यातूनच ‘उद्योगजगतासाठी इनक्युबेटर’ सारखी विलक्षण कल्पना आयआयटीत कशी प्रत्यक्षात आली आहे याचा धांडोळा प्रशांत जोशी यांनी घेतला आहे. प्रतीक शेलार आणि स्वप्निल कुलकर्णी या दोन मराठमोळ्या तरुणांनी इंग्लंडमध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रात स्टार्टअपचं प्रारुप यशस्वी करुन दाखवलं आहे. त्यांच्या या यशाचा मागोवा सुहास जोशी यांनी घेतला आहे. ‘केल्याने होत आहे रे..’या विभागातले मानकरी आहेत, कर्नल सुरेश पाटील आणि कमांडर रवींद्र पाठक. त्याशिवाय पुण्यातल्या वाहतुकीच्या संदर्भातल्या बदलांना कारणीभूत ठरलेल्या प्रशांत इनामदार आणि श्रीकांत कर्वे यांच्याविषयी विनायक करमरकर आणि पावलस मुकुटमल यांनी लिहिलं आहे.