‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमात तज्ज्ञ शिक्षकांचा कानमंत्र
दहावी हा शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दहावीच्या गुणांनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करियरची दिशा निश्चित होत असते. याचा ताण शालांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर असतो. हा ताण निवळावा आणि विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सकारात्मकतेने सामोरे जाता यावे यासाठी ‘लोकसत्ता’ सोमवारपासून ‘यशस्वी भव’ हा उपक्रम सुरू करत आहे.
यंदाच्या लेखमालेत अभ्यासक्रमाचे तंत्र, प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र, महत्त्वाचे प्रश्न, प्रश्न पत्रिकेचा नवा पॅटर्न, मराठी प्रश्नपत्रिका स्वरूप बदल, संस्कृत प्रश्नपत्रिका स्वरूप बदल, निबंध लेखन तंत्र, प्रश्नपत्रिका/ उत्तरपत्रिका यांचा समावेश करण्यात येणार आहे. यंदा हे मार्गदर्शन मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
सध्या परीक्षा पद्धती बदलत चाललेली असून केवळ विषयांचे ज्ञानच नव्हे तर त्या विषयाचे आकलन आणि सादरीकरण यांनाही तेवढेच महत्त्व दिले जात आहे. शिक्षण मंडळदेखील सीबीएसई, आयसीएसई यांच्या प्रमाणेच ‘अ‍ॅक्टीव्हिटी’वर आधारित शिक्षण पद्धती अमलात आणीत आहे आणि यासाठी नेमलेल्या समितीमधील काही सदस्य आपल्याला या लेखमालेमधून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये संपूर्ण पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रमाचे विश्लेषण देण्यात येणार असून अभ्यासक्रमाची मुद्देसूद मांडणी करण्यात येणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबरपासून सराव प्रश्नपत्रिका, नमुना उत्तरपत्रिकांवर जास्तीत जास्त भर दिला जाईल. लोकसत्ता ‘यशस्वी भव!’ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मागील १८ वर्षांपासून मार्गदर्शन करीत आहे. नव्या स्वरूपातील ‘यशस्वी भव’ लेखमाला यंदाही दहावीच्या विद्यार्थ्यांची या टप्प्याची वाटचाल सुकर व्हावी यासठी निश्चित मदत करेल. टीजेएसबी सहकारी बँक यांनी प्रायोजित केली असून तन्वी हर्बल प्रॉडक्ट आणि लक्ष्य अकॅडमी यांच्या सहकार्याने ती सादर करण्यात येत आहे.