27 February 2021

News Flash

करिअर निवडताना आवड, क्षमतेचा विचार व्हावा!

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत डॉ. संदीप भाजीभाकरे यांचा सल्ला

लोकसत्ता मार्ग यशाचा कार्यशाळेत ठाणे सायबर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   कार्यक्रमाला विद्यार्थी-पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.                                (छाया - दीपक जोशी)

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत डॉ. संदीप भाजीभाकरे यांचा सल्ला

ठाणे : अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांसमोर करिअरचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. भरपूर पर्याय असणे चांगले असले, तरी भविष्याच्या वाटा निवडताना विद्यार्थ्यांनी आपली आवड नेमकी कुठे आहे याचा प्राधान्याने विचार करायला हवा. विद्यार्थी आणि पालकांनी समन्वयाने आपल्या पाल्याच्या आवड, संधी, क्षमतेचा विचार करायला हवा, असे मत ठाणे सायबर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत व्यक्त केले. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा आरंभ शुक्रवारी  ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे झाला.

करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात आपली आवड जपतानाच मेहनतीला पर्याय नसतो. करिअर कोणते असावे आणि त्यासाठी शिक्षणाचा कोणता मार्ग निवडावा हे ठरविण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकांनी विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींची आवड आहे त्याच क्षेत्राची निवड करण्याची संधी त्याला देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या क्षेत्रात उच्च प्रतीचे काम करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मार्गदर्शन करताना भाजीभाकरे यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी सुरुवातीपासूनच चौफेर वाचनाची सवय असायला हवी. आयुष्यात आपण जे ठरवितो तसेच सगळे घडेल असे नसते. ठरवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या नाहीत तरी निराश होऊ नये. आपल्या आयुष्यात अनेक संधी येत असतात. या संधींची वाट पाहणे, त्या शोधणे महत्त्वाचे असते. कामात स्वत:ला झोकून देऊन काम करा. एखाद्या कामाचे कौतुक होत नसल्यास आपला आनंद टिकवता आला पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. भारताला विकसित करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस मेहनत घेत असतात. त्यामुळे प्रशासकीय सेवेत अत्यंत चांगले भविष्य घडविता येते, असे त्यांनी सांगितले. ताणाविषयी बोलताना वीणेची तार अधिक घट्ट झाल्यास ती वीणा ऐकायला मंजूळ वाटत नाही किंवा ती सैल झाली तरीही त्यातून हवा असलेला ध्वनी बाहेर पडत नाही. मात्र ती योग्य प्रमाणात घट्ट केल्यास त्यातून मंजूळ स्वर बाहेर पडतात. ताणाचे स्वरूपही या वीणेच्या तारेप्रमाणे आहे. अतिरिक्त ताण घेऊन ध्येय साध्य करता येत नाही. त्यामुळे या ताणाचे प्रमाण आवश्यक त्या प्रमाणातच असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

विद्यार्थी आणि पालकांना आजही संधी

दहावी आणि बारावीनंतरच्या  विविध करिअर वाटा उलगडणाऱ्या या कार्यक्रमास शुक्रवारी उपस्थित राहता आले नाही, त्या विद्यार्थी आणि पालकांना आज या कार्यशाळेत उपस्थित राहण्याची संधी आहे. ठाणे शहर परिमंडळ-१चे  पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. कार्यशाळेच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.  ऑनलाइन प्रवेशिकांसाठी : www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-thane-1st-2nd-june-2018-203124.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 4:00 am

Web Title: loksatta marg yashacha 2018 sandeep bhajibhakare career guidance
Next Stories
1 कचऱ्यापासून खतनिर्मितीत शाळांचा वाढता सहभाग
2 औद्योगिक सांडपाण्यावर यापुढे खासगी संस्थांद्वारे प्रक्रिया
3 एसटीत कंत्राटयुग?
Just Now!
X