शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. प्रवेशाची लगबग सुरू आहे. नेमका कोणत्या शाखेत प्रवेश घेतल्यावर आपल्या पाल्याला उत्तम करिअर करता येईल, याविषयी सर्वच पालकांना काळजी असते. आपले भविष्य घडविण्यासाठी कोणते करिअर योग्य राहील, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला असतो. या प्रश्नांना योग्य तज्ज्ञांकडून उत्तरे मिळवून देण्यासाठीच ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

येत्या १४ आणि १५ जून रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होत आहे. १४ जून रोजी शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तर १५ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

या कार्यशाळेत विविध विषयांतील तज्ज्ञ, करिअर समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तर वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. विधि शिक्षणाविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. कथा-पटकथा-संवादलेखनातील करिअरविषयी माहिती देतील शिरीष लाटकर, टीव्ही पत्रकारितेच्या जगातील प्रवासाबद्दल सांगतील, एबीपी माझाच्या पत्रकार ज्ञानदा कदम. तर समाजमाध्यमांवर करिअर घडवण्याचा मंत्र देतील, भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाचे सारंग साठय़े आणि डिजिटल मीडिया कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर प्रिया आडिवरेकर. याचसोबत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या सर्व तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच आपल्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही या तज्ज्ञांशी थेट संवाद साधून करता येईल.

प्रायोजक

  • प्रेझेंटिंग पार्टनर- आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स
  • सहप्रायोजक – विद्यालंकार क्लासेस
  • पॉवर्ड बाय पार्टनर्स – एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सासमिरा, ए के एज्युकेशनल कन्सल्टंट, सिम्बॉयसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी, एज्युकेशन ओव्हरसीज,  आयएनआयएफडी
  • बँकिंग पार्टनर – स्टेट बँक ऑफ इंडिया

लक्षात ठेवा

  • या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी लागेल. त्यासाठी खालील ठिकाणी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळात प्रवेशिका मिळू शकतील.
  • रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
  • महाराष्ट्र वॉच अ‍ॅण्ड ग्रामोफोन कंपनी, शॉप नं. २ नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर (प.)
  • त्याचबरोबर पुढील लिंकवरूनही विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात.- http://tiny.cc/margyashacha2019dadar