• शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा सल्ला
  • ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेचे उद्घाटन

‘पैसा, प्रसिद्धी म्हणजे यश नाही. आपल्यासाठी ‘यश’ म्हणजे काय याचा विचार करा, ते ओळखा आणि त्यानुसार करिअर घडवा. आपली क्षमता, कौशल्य, आवड ओळखून करिअरची वाट निवडा,’ असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्याबरोबरच ‘इतर मुले काय करतात याची आपल्या मुलाशी तुलना करण्याऐवजी त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या,’ असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात केले.

करिअरनिवडीच्या वळणावर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणाऱ्या, विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तावडे यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. ‘विद्यार्थ्यांचा कल कळावा यासाठी ‘कलचाचणी’ घेण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला. दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कलचाचणीच्या निष्कर्षांनुसार त्यांनी पुढील वाटचाल निश्चित करावी. त्याबाबत काही शंका असल्यास ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यावर संपर्क साधावा,’ असे आवाहन तावडे यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘नापास’ असा उल्लेख बंद करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, असे सांगून तावडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. अनेक नव्या संस्था सुरू झाल्या आहेत. परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो म्हणजे तो अयशस्वीच असतो असा अर्थ होत नाही. ठरावीक विषयांवरील परीक्षेत यश मिळाले नाही म्हणजे तो विद्यार्थी काहीच करू शकत नाही असा अर्थ नाही. कुणीही नापास नसतो यावर माझा विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कौशल्य ओळखून अभ्यासक्रमांची निवड करावी. गेल्या वर्षी कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ८० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला,’ असे तावडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

‘मी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले’

अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पद्धत रद्द केल्यामुळे दहावीच्या घटलेल्या निकालाबाबत तावडे यांनी या वेळी त्यांचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन नुकसान यामुळे टाळल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पद्धत बंद केल्याने निकाल कमी झाल्यामुळे सध्या विद्यार्थी आणि पालक माझ्यावर नाराज आहेत. २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर निकाल एकदम वाढला. हे गुण देण्याच्या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांना २० पैकी १८ किंवा १९ गुण मिळाले होते. मग याला गुणवाढ म्हणायचे की सूज? विद्यार्थ्यांना या अंतर्गत मूल्यमापनामुळे अधिक गुण मिळत होते. त्यामुळे सगळ्यांनाच आयआयटीची स्वप्ने पडत होती. अशा वेळी क्षमता नसतानाही मग भरमसाट शुल्क भरून शिकवण्या, नाही जमले की निराशा अशा दुष्टचक्रात विद्यार्थी अडकत होते. त्यातून मी विद्यार्थ्यांना बाहेर काढले.’

आजही संधी

  • प्रमुख अतिथी – पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व औषधे प्रशासन
  • करिअर आणि ताण – डॉ. हरीश शेट्टी
  • विधि शिक्षणातील संधी – प्रा. नारायण राजाध्यक्ष
  • वैद्यकीय क्षेत्रातील संधी – डॉ. अमोल अन्नदाते
  • करिअरच्या वेगळ्या वाटा – डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर प्रिया आडिवरेकर, लेखनातील करिअर शिरीष लाटकर, टेलिव्हिजनवरील पत्रकारिता ज्ञानदा कदम
  • विविध क्षेत्रांतील करिअर संधी – विवेक वेलणकर

लोकसत्ता मार्ग यशाचा

  • कुठे – रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
  • कधी – शनिवार १५ जून, सकाळी ९.४५ पासून कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी लागेल. प्रवेशिका कार्यक्रमस्थळी मिळतील.

प्रायोजक

  • प्रेझेंटिंग पार्टनर- आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स
  • सहप्रायोजक – विद्यालंकार क्लासेस
  • पॉवर्ड बाय पार्टनर्स : एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सासमिरा, ए के एज्युकेशनल कन्सल्टंट, सिम्बॉयसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी, एज्युकेशन ओव्हरसीज,  आयएनआयएफडी
  • बँकिंग पार्टनर : स्टेट बँक ऑफ इंडिया