विवेक वेलणकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई : सध्याची अस्थिरता तात्पुरती आहे, परंतु आपल्या करिअरबाबतचे निर्णय हे दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत. त्यामुळे आजच्या परिस्थितीची धास्ती घेण्याची गरज नाही. एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना पुढील तीन ते सहा वर्षांनंतर काय परिस्थिती असेल, याचा अदमास घेणे आणि आपली आवड लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणतेही क्षेत्र निवडले तरी कष्टाला पर्याय नाही,’ असे मत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी रविवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या वेबसंवादात व्यक्त केले.

अस्थिर परिस्थितीत करिअरची दिशा कशी निश्चित करावी? कोणते क्षेत्र निवडावे याबाबत वेलणकर यांनी विद्यार्थी आणि पालकांना ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या वेबसंवादात मार्गदर्शन केले. ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ या उपक्रमाचे सहप्रायोजक होते. ‘लोकसत्ता’च्या स्वाती पंडीत यांनी वेलणकर यांच्याशी संवाद साधला तर ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले.

क्षेत्र कसे निवडावे, प्रवेशाबाबत निर्णय कसे घ्यावेत याबाबत वेलणकर म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत एक हमखास, सुरक्षित मार्ग निवडण्याकडे कल आहे. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. सुरक्षित काय यापेक्षा आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन क्षेत्र निवडावे. परीक्षेत मिळालेल्या टक्क्यांनुसार कला, विज्ञान किंवा वाणिज्य या शाखा निवडण्याची चूक आजही केली जाते. सध्या अंतर्गत मूल्यमापन, सर्वोत्तम पाच विषयांचे गुण धरणे, कला, क्रीडा अतिरिक्त गुण यांमुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी अधिक दिसते. नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले म्हणून विद्यार्थी विज्ञान शाखेला प्रवेश घेतात. मात्र, गणित किंवा विज्ञानातच ते जेमतेम उत्तीर्ण झालेले असतात. दुसरी चूक म्हणजे मित्र काय निवडतात त्यानुसार आपला निर्णय घेणे. अशा पद्धतीने निर्णय घेतले असतील तर आताच ते बदलणे योग्य ठरेल.’’

चांगली कामगिरी, चांगली संधी

सद्य:स्थितीत कोणत्या क्षेत्रात चांगली संधी मिळेल असा पालकांना पडणारा नेहमीचा प्रश्न आहे. पण याचे नेमके उत्तर कधीच देता येत नाही. संधी प्रत्येक क्षेत्रात असते. त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या २५ टक्क्य़ांना नेहमीच उत्तम संधी, यश मिळू शकते आणि वाईट कामगिरी करणाऱ्या २५ टक्क्य़ांना संधी मिळत नाही. संधी एखाद्या क्षेत्राला मिळत नाही, तर तेथे स्वत:ला सिद्ध करणाऱ्यांना मिळते. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडणे आवश्यक आहे. जेणेकरून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या २५ टक्क्य़ांमध्ये आपण असण्याची शक्यता अधिक असते.

कोणते क्षेत्र निवडायचे?

सध्या करोनाचा प्रादुर्भाव, आर्थिक घडामोडी यांमुळे अनेक क्षेत्रांतील कंपन्यांचे काम थांबले, त्यांनी मनुष्यबळ कमी केले आदी गोष्टी कानावर येतात. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याबाबतचा गोंधळ अधिक वाढताना दिसतो. अर्थशास्त्र, विधि, डिझायनिंग, अ‍ॅनिमेशन, परदेशी भाषांचे शिक्षण या काही क्षेत्रांत चांगल्या मनुष्यबळाची गरज नेहमीच असते. हॉटेल व्यवसाय सद्य:स्थितीत अडचणीत असल्याचे दिसत असले तरी ते तात्पुरते आहे. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील मनुष्यबळाची गरजही वाढती आहे. संज्ञापन क्षेत्रातील पारंपरिक संधीबरोबरच ‘समाज माध्यम व्यवस्थापन’ असे नवे क्षेत्र तयार झाले आहे, त्यातही मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र या क्षेत्रातही संधी आहेत. मात्र, हे संशोधनाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बारावीनंतर किमान ८ ते ९ वर्षे म्हणजे ‘पीएचडी’पर्यंत शिकण्याची तयारी हवी. संशोधनासाठीच्या तरतुदी येत्या काळात वाढणार आहेत. करोनानंतर अनेक क्षेत्रांतील स्पर्धा वाढणार आहे, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात मेहेनत करावीच लागणार, असे विवेक वेलणकर म्हणाले.

अभियांत्रिकी पदवी की पदविका?

सध्या अकरावीचे आणि दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू झाले आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊन नंतर प्रवेश परीक्षा देऊन पदवीला प्रवेश घेता येतो. तसाच अभियांत्रिकी पदविकेचाही मार्ग आहे. दहावीनंतर तीन वर्षे पदविका आणि त्यानंतर अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षांला थेट प्रवेश घेऊन पुढे तीन वर्षे पदवीचे शिक्षण घेता येते. यापैकी कोणता मार्ग निवडायचा? याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. या दोन्हींचे फायदे-तोटे आहेत. पदविकेला प्रवेश घेतल्यास बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षा, त्याच्या शिकवण्या हे टाळता येऊ शकते. ज्या विषयांत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला त्याच विषयात पदवी घेत असल्यामुळे पदवीचा अभ्यास काहीसा सोपा होतो. पदविका घेतल्यावर पुढे शिकायचे नाही असे ठरवले तरी पदविका ही व्यावसायिक पात्रता असल्यामुळे हाती नोकरी किंवा व्यवसायाचा पर्याय राहतो. पदविका प्रवेशाचे तोटेही आहेत. दहावीनंतरच पदविकेसाठी शाखा निवडावी लागते. त्यात गोंधळ होण्याची शक्यता असते. बारावीनंतर पदवीला प्रवेश घेताना उपलब्ध जागांची संख्या अधिक असते. मात्र, पदविकेनंतर द्वितीय वर्षांसाठी प्रवेश घेताना जागा कमी असतात. त्यामुळे उत्तम महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अधिक स्पर्धा असते, याकडे वेलणकर यांनी लक्ष वेधले.

स्पर्धा परीक्षा आणि संरक्षण सेवा

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. मात्र तयारी करणाऱ्या ५ ते १० टक्के विद्यार्थ्यांनाच त्यात दरवर्षी यश मिळते हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र, स्पर्धा परीक्षाच द्यायच्या असे ठरवले असेल तर त्याची तयारी अगदी अकरावीपासून सुरू करायला हवी. अभियांत्रिकीची पदवी घेऊन नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकडे कल असतो. अभियांत्रिकीची पदवी म्हणजे हाती एक पर्याय राहील, असा पालक आणि विद्यार्थ्यांचा समज असतो. मात्र, पदवीनंतर तीन-चार वर्षे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्यानंतर यशाने हुलकावणी दिली तर पुन्हा अभियांत्रिकी क्षेत्राकडे येता येईलच याची खात्री देता येऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर प्राधान्याने कला किंवा वाणिज्य शाखेची निवड करणे योग्य. संरक्षण सेवेत कायम वेगवेगळ्या पातळीवर संधी आहेत. त्यासाठी प्रवेश परीक्षा असते. मात्र, संरक्षण सेवेच्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेत गणित विषय निवडावा. संरक्षण अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय या क्षेत्रांतही चांगली संधी आहे, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.

काय आवडते ते ठरवा! आवडीच्या विषयाचे शिक्षण घेणे नेहमीच योग्य ठरते. शिकलेल्या सर्व विषयांची यादी करून खूप आवडलेले, जमलेले विषय, मध्यम आवडलेले, जमलेले विषय आणि नावडलेले किंवा न जमलेले विषय असे वर्गीकरण करा. खूप आवडलेल्या विषयांचे पुढील शिक्षण कोणत्या शाखेतून घेता येईल, हे पाहून प्रवेशाचा निर्णय घेणे योग्य ठरेल, असा सल्ला विवेक वेलणकर यांनी दिला.

सीईटी की जेईई? : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे प्रवेश हे राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून (सीईटी) होतात, तर आयआयटी किंवा इतर अनेक राष्ट्रीय स्तरांवरील संस्थांमधील प्रवेश हे राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेच्या (जेईई) माध्यमातून होतात. जेईई मुख्य परीक्षा द्यावीच, मात्र जेईई आणि सीईटीची तयारी स्वतंत्रपणे करावी लागते, असे वेलणकर म्हणाले.