‘लोकसत्ता’तर्फे १९ व २० मे रोजी ठाण्यात कार्यशाळा

मळलेल्या वाटांपलीकडेही करिअरच्या क्षितिजाचा विस्तार आता होऊ लागला आहे. संधी तर अनेक आहेत परंतु नेमकी कोणती ओळखावी, याचे ज्ञान फारच कमी जणांना आहे. म्हणूनच ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित केलेली आहे. शुक्रवार १९ आणि शनिवार २० मे रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे हा कार्यक्रम होणार आहे. वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ  मार्गदर्शन करतील.

या करिअर कार्यशाळेचे उद्घाटन ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) सत्यनारायण यांच्या हस्ते होईल. ते या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील. वाढती स्पर्धा, अपेक्षा यांमुळे विद्यार्थ्यांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी काय केले पाहिजे, याविषयी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजेंद्र बर्वे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दहावीनंतर करिअर घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे, याविषयी प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दहावी-बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा याबद्दलही ते विशेष मार्गदर्शन करतील.

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गरजेची असलेली ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा, तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘जेईई’ ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षांमध्ये कसे यश मिळवावे, त्यासाठी अभ्यासाच्या युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतील, या विषयातील तज्ज्ञ शिक्षक, प्रा. किशोर चव्हाण, प्रा. काटदरे आणि प्रा. डॉ. वझे. सोबतच जेईई २०१६चा टॉपर प्रिय शहासुद्धा विद्यार्थ्यांसोबत त्याचे अनुभव शेअर करायला येणार आहे.

आजच्या डिजिटल काळात या माध्यमांचा करिअरसाठी कशा प्रकारे वापर करून घ्यावा याची माहिती देतील, डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ मिहिर करकरे. तर खेळामधील चमकदार करिअरविषयी नीता ताटके आणि वर्षां उपाध्ये या क्रीडातज्ज्ञ माहिती देतील. जाहिरात क्षेत्रातील संधीबाबत या क्षेत्रातील उच्चपदस्थ  अभिजित करंदीकर जाहिरात विश्वातले करिअर उलगडून दाखवतील. उत्तम आवाज ही एक देणगी आहे. त्याचा करिअरसाठी कशा प्रकारे वापर करू घेता येईल, याविषयी सुप्रसिद्घ आर जे रश्मी वारंग माहिती देतील.  या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. तसेच सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रवेशिका कुठून मिळवाल?

प्रत्येक दिवसाचे ५० रु. इतके शुल्क भरून प्रवेशिका मिळतील.  सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात खालील ठिकाणी प्रवेशिका मिळतील.

हॉटेल टिपटॉप प्लाझा- एलबीएस मार्ग, ठाणे (प.)

लोकसत्ता कार्यालय, ठाणे – दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या मागे, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (प.)

विद्यालंकार – ईशान आर्केड,तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले मार्ग, ठाणे(प.)

यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत.

www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-330402

प्रायोजक

अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत. तर, विद्यालंकार आणि एमआयटी-आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर आहेत. आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स हे सपोर्टेड बाय पार्टनर आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, सासमिरा आणि लक्ष्य अकॅडमी हे पॉवर्ड बाय पार्टनर्स असून ‘युअरफिटनेस्ट’ या कार्यशाळेचे हेल्थ पार्टनर आहेत.