‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; दहावी, बारावीनंतरचा पर्याय जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

कोणती शाखा निवडायची? अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? यांसारख्या करिअरची दिशा ठरवताना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता – मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात शुक्रवारी विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यशाळा सुरू होताना असलेले विद्यार्थ्यांचे भांबावलेले चेहरे कार्यशाळेच्या पहिल्या दिवसअखेरीस उत्तरे मिळवून, समाधानाने योग्य वाट चोखाळण्यासाठी सज्ज झाले. ‘आपली आवड आणि क्षमता ओळखून क्षेत्र निवडा. निवडलेल्या क्षेत्रात यशाचा टप्पा गाठण्यासाठी मेहनतीची तयारी ठेवा,’ असा गुरुमंत्र विद्यार्थ्यांना कार्यशाळेत तज्ज्ञांनी दिला.

‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता – मार्ग यशाचा’ या रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचे डॉ. जयवंत शेलार, विद्यालंकारचे विश्वास आणि नम्रता देशपांडे, प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, ‘लोकसत्ता’चे दिनेश गुणे आदी उपस्थित होते.

करिअरचे वेगवेगळे पर्याय, त्यासाठीची तयारी, वैद्यकीय क्षेत्रातील संधी, विधि क्षेत्राचा अभ्यास, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांतील संधींबरोबरच कौशल्य विकासाबाबत तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच वेळी अभ्यासाचे नियोजन, तणावाला कसे तोंड द्यावे याचे सूत्र विद्यार्थ्यांना मिळाले. क्षेत्र कोणतेही असो, चिकाटी, मेहनत महत्त्वाची असते हे लक्षात घ्या, असा संदेश तज्ज्ञांनी दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही वक्त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. वेगवेगळ्या संस्था, अभ्यासक्रम यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनालाही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.

‘‘क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा विचार करणे आवश्यक आहे. आकलन क्षमता विकसित होण्यासाठी अनुभव महत्त्वाचा आहे. मुलांनी येणारा तणाव स्वीकारून तो कमी करण्यासाठी मार्ग शोधायला हवेत. शिकत राहणे, जुने शिकलेले सोडून देणे आणि नवीन शिकण्याची कायम तयारी असणे या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात,’’ असे डॉ. बर्वे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष न्यायालयात खटला लढवण्यासाठी उभे राहण्यापलीकडे विधि क्षेत्रात अनेक निर्माण होणाऱ्या संधी, पाच वर्षांचा अभ्यासक्रम आणि तीन वर्षांचा अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा यांची ओळख प्रा. नारायण राजाध्यक्ष यांनी करून दिली. ‘‘वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक जण कायद्याच्या अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. या क्षेत्रातच काम करण्यासाठी किंवा ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्याला पूरक म्हणून विधि अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. अनेक क्षेत्रांमध्ये विधिज्ञांची गरज असते. मात्र, या क्षेत्रासाठी खूप चिकाटी आणि अभ्यासाची गरज आहे. हा अभ्यास परीक्षेपुरता नाही तर आपले प्रभुत्व निर्माण करण्यासाठी, आपले ज्ञान वाढवण्यासाठी हवा,’’ असे राजाध्यक्ष यांनी सांगितले. ‘‘वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस या पदव्यांबरोबरच वैद्यक पूरक क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज आहे. फिजिओथेरपी, ऑपरेशन थिएटरचे व्यवस्थापक, रुग्णालय व्यवस्थापक, तंत्रज्ञ अशा अनेक संधी या क्षेत्रात आहेत. डॉक्टर होण्याइतकीच ही क्षेत्रेही महत्त्वाची आहेत त्याचाही विचार करिअरच्या टप्प्यावर करणे आवश्यक आहे. संयम, मेहनतीची तयारी आणि सेवाभावी वृत्ती हे वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक आहे,’’ असे डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.

‘करिअरच्या वेगळ्या वाटा’ या सत्रात कथा, पटकथा, संवाद लेखन याविषयी शिरीष लाटकर, ‘टीव्ही पत्रकारिता’ या विषयावर एबीपी माझा वाहिनीच्या पत्रकार ज्ञानदा कदम आणि समाजमाध्यमांवरील करिअरबाबत ‘भाडिपा’चे सारंग साठय़े यांनी संवाद साधला. विविध क्षेत्रे, करिअरचे पर्याय, त्यासाठीच्या प्रवेश परीक्षा अशी माहिती करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या सत्रात दिली.

आजही संधी

करिअरबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची संधी शनिवारी (१५ जून) मिळणार आहे. आजही  ही कार्यशाळा होत आहे.

करिअर आणि ताण –

डॉ. हरीश शेट्टी

विधि शिक्षणातील संधी –

प्रा. नारायण राजाध्यक्ष

वैद्यकीय क्षेत्रातील संधी –

डॉ. अमोल अन्नदाते

’ करिअरच्या वेगळ्या वाटा – डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर प्रिया आडिवरेकर, लेखनातील करिअर शिरीष लाटकर, टीव्ही पत्रकारिता ज्ञानदा कदम

विविध क्षेत्रांतील करिअर संधी – विवेक वेलणकर

प्रायोजक

* प्रेझेंटिंग पार्टनर- आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स

* सहप्रायोजक – विद्यालंकार क्लासेस

ल्ल पॉवर्ड बाय पार्टनर्स : एनएमआयएमएस स्कूल ऑफ  हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सासमिरा, ए के एज्युकेशनल कन्सल्टंट, सिम्बॉयसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी, एज्युकेशन ओव्हरसीज,  आयएनआयएफडी

* बँकिंग पार्टनर : स्टेट बँक ऑफ इंडिया