मुंबईची प्राथमिक फेरी उत्साहात; आठ वक्त्यांची अंतिम फेरीसाठी निवड
विचाराची सुस्पष्टता, सुबोध मांडणी, योग्य शब्दांवर आघात, खणखणीत वाणी आणि अभ्यासपूर्वक विवेचन अशा वैविध्याने फुललेल्या वक्तृत्व शैलीचा आविष्कार सादर करत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ वक्तृत्व स्पर्धेची मुंबई विभागीय प्राथमिक फेरी रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडली. ‘एक्स्प्रेस टॉवर्स’मधील सभागृहात झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये विविध महाविद्यालयांतून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नियोजित विषयांवर आपली मते मांडली. प्राथमिक फेरीतून उत्कृष्ट आठ वक्त्यांची मुंबईच्या विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
उत्तमोत्तम वक्त्यांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील आजच्या पिढीलाही आपले विचार मांडायचे असतात. अशा तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ही स्पर्धा आयोजित केली आहे. हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असून ‘जनता सहकारी बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’ हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सवर्ि्हसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांचे स्पर्धेस सहकार्य लाभले असून युनिक अकॅडमी व स्टडी सर्कल या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. मुंबईतील २९ महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी
सहभाग घेतलेल्या या स्पर्धेसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?’, ‘धर्म आणि दहशतवाद’, ‘बिइंग ‘सेल्फी’श’, ‘इतिहास वर्तमानातला’ आणि ‘मला कळलेली नमो नीती’ असे विषय देण्यात आले होते. यात ‘धर्म आणि दहशतवाद’ तसेच ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?’ या दोन्ही विषयांना विद्यार्थ्यांनी अधिक पसंती देत ठकळपणे विचार मांडले. धर्माशी दहशतवादाला जोडण्याचे काम जगभरात काही शक्ती करत असून सध्याच्या विदारक परिस्थितीचे दाखले देत, धर्माला शांतता व प्रेम यांची जोड देणे गरजेचे असल्याचे स्पर्धकांनी आवर्जून नमूद केले. तर स्त्रियांच्या सन्मानासाठी परंपरेतले व इतिहासातले दाखले दिले जातात. वास्तवात याबाबत दुटप्पीपणाची भूमिका घेतली जाते. जगात झपाटय़ाने बदल होत असताना स्त्री-विषयक मानसिकतेत मात्र बदल होताना दिसत नाही, असे निरीक्षण नोंदवीत विद्यार्थ्यांनी सद्य:परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवले. ‘बिइंग ‘सेल्फी’श’ या विषयावर बोलताना प्रत्येक क्षण ‘विशेष’ करण्याच्या मोहात टिपल्या जाणाऱ्या सेल्फीपेक्षा तो क्षण आधी समरसून जगला गेला पाहिजे, स्वत:मध्ये रमण्यापेक्षा समाजात चाललेल्या विधायक कामाकडे तरुण पिढीने लक्ष द्यावे, असा समंजस सूरही विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून व्यक्त झाला. ‘मला कळलेली नमो नीती’ या विषयाकडे मात्र मुंबईतील स्पर्धकांनी साफ दुर्लक्ष केले.
स्वत:ची निश्चित भूमिका हवी
रुपारेल महाविद्यालयाच्या प्रा. अनघा मांडवकर व सोमय्या महाविद्यालयाचे प्रा. प्रसाद भिडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. वक्तृत्व कलेचा तंत्र आणि मंत्र यांचा ताळमेळ साधत आपले म्हणणे प्रभावीपणे इतरांना पटवून देणे गरजेचे आहे. विषयाच्या निवडीपासून मांडणीपर्यंत निश्चित भूमिका असायला हवी, असे प्रा. मांडवकर यांनी सांगितले. तर अशा स्पर्धातून विषय हाताळताना विद्यार्थ्यांनी स्वत:ला आव्हान दिले पाहिजे.स्पर्धेमुळे स्वत:मध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे प्रा. भिडे या वेळी म्हणाले.
मुंबई विभागातून अंतिम फेरीसाठी निवड झालेले स्पर्धक
तुषार जोशी – म. ल. डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले
सुप्रिया ठाकूर- नालंदा महाविद्यालय, बोरिवली
आदित्य कुलकर्णी- साठय़े महाविद्यालय, विलेपार्ले
प्रिया तरडे- डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माहीम
प्रणव कांड- कीर्ती महाविद्यालय, दादर
आदित्य जंगले- रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा
अथर्व भावे- रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा
प्रियांका तुपे- साठय़े महाविद्यालय, विलेपार्ले
रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतून ११ जणांची निवड
‘वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पध्रेअंतर्गत रविवारी रत्नागिरीत झालेल्या रत्नागिरी विभागाच्या प्राथमिक फेरीत ११ जणांची निवड करण्यात आली.