‘लोकसत्ता’तर्फे नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमातील निवडक नऊ दुगार्ंच्या सत्काराचा संगीतमय सोहळा येत्या मंगळवारी नामवंतांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात संध्याकाळी ६.३० वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.

गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता’ने ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध घेऊन त्यांना गौरवले आहे. तिच्या योगदानाचा सत्कार केला आहे. कोणी जंगल वाचवणारी दुर्गा होती, तर कुणी अंध, अपंग, विकलांग, मानसिक रुग्णाची काळजी वाहणारी दुर्गा, कोणी विधवांना सन्मानाचे आयुष्य देणारी, कुणी निराधारांची काळजी घेणारी दुर्गा होती. याही वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या नऊ जणींची निवड करण्यात आली आहे. नर्मदेतील मुलांसाठी कार्य करणाऱ्या भारती ठाकूर, मानवी तस्करी रोखणाऱ्या शर्मिष्ठा वालावलकर, प्राणी मैत्रीण सृष्टी सोनवणे, आदिवासी मुलांना शिक्षण देणारी नासरी चव्हाण, कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ. कल्पना जोशी, देवीचे गाव तुळजापूर स्वच्छ करण्याचा वसा घेतलेल्या भारतबाई देवकर त्याचप्रमाणे स्वत अंध असून अंधांना स्वयंपूर्ण बनवणाऱ्या राधा बोरडे, आदिवासींच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉ. सुजाता गोडा आणि स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेल्या उद्योजिका अनुराधा देशपांडे या नऊ जणी या वर्षीच्या नवदुर्गा ठरल्या आहेत. या कर्तृत्ववान दुर्गाचा सत्कार विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान नामवंत पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे.

‘शोध नवदुर्गाचा’

  • कधी: दि. २५ ऑक्टोबर
  • केव्हा: सायंकाळी ६.३० वाजता
  • कुठे: रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, मुंबई</li>
  • प्रवेश विनामूल्य (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)
  • प्रस्तुती : विम
  • सहप्रायोजक : केसरी