समाजात माणूस म्हणून वावरताना जे दिसले, जाणवले, अनुभवले त्याची सांगड घालत आपल्या कर्तृत्वाचा आलेख लिहिताना भोवतालच्या समाजमनाचे सुखदु:ख.. त्याची स्पंदने टिपून घेणाऱ्या आणि नानाविध क्षेत्रांत स्वबळावर उभ्या राहिलेल्या ‘नवदुर्गा’च्या शक्तिजागराने ‘लोकसत्ता’ आयोजित ‘नवदुर्गा २०१६’ सन्मान सोहळा मंगळवारी रंगला. स्वत:बरोबरच इतरांचाही उत्कर्ष साधायचा, या विचाराने, आपल्या स्वप्नांना आकार देताना व्यापक समाजकार्य उभारणाऱ्या महिलांचा गौरव हे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले.

‘लोकसत्ता’ आयोजित, वीम प्रस्तुत, केसरी सहप्रायोजित ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळ्याचे तिसरे पर्व मंगळवारी प्रभादेवी येथील रिवद्र नाटय़मंदिरात रंगले. ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळ्याचे औचित्य ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी स्पष्ट केले. ‘दुग्रेचा उल्लेख कित्येकदा पुराणातूनच आढळून येतो; मात्र वास्तवात प्रत्येकाच्या आयुष्यात एक दुर्गा असते. कधी ती शिक्षिकेच्या, कधी आईच्या रूपात असते, पण तिच्या कामाबद्दल कधीच बोलले जात नाही. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, खासगी संस्थांची मदत न घेता स्वबळावर काम करणाऱ्या दुर्गाची ओळख समजाला करून देणे महत्त्वाचे होते’, असे कुबेर म्हणाले.

तर, ‘यंदा ‘नवदुर्गा’चा शोध घेताना चाकोरीबाहेरच्या क्षेत्रांमध्ये आत्मबळावर नवनवे कार्य उभारणाऱ्या महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातील महिलांच्या कार्याचा वेध घेण्यात आला’, अशी माहिती लोकसत्ता ‘चतुरंग’ पुरवणीच्या फीचर एडिटर आरती कदम यांनी दिली. ‘आज अनेक महिला आपापल्या परीने समाजकार्यातील वाटा उचलत असताना ‘नवदुर्गा’ची निवड करणे हे एक आव्हान ठरले’, असे त्या म्हणाल्या.

‘शोध नवदुर्गाचा’ उपक्रमातील यंदाच्या निवडक नऊ दुर्गाचा सत्कार नाटय़-निर्मात्या लता नार्वेकर, मुंबईच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, दिव्यांग मुलांसाठी गेली ३५ वष्रे कार्यरत असलेल्या कांचन सोनटक्के, नेत्रशल्यविशारद डॉ. रागिणी पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रख्यात गायिका देवकी पंडित, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, कविता लाड-मेढेकर आणि मध्य रेल्वे पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सादर करण्यात आलेल्या संगीतमय कार्यक्रमाची प्रस्तुती ‘मिती क्रिएशन’ यांची होती. तर सहप्रायोजक ‘केसरी’ होते. नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे आणि सहकलाकार यांचे नृत्य, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि कविता मेढेकर यांचे अभिवाचन, ‘मत्री’ ढोलपथकाचे वादन आणि चित्रकार शुभांगी सामंत यांचे चित्र रेखाटन या वेळी सादर झाले.

यांच्या कार्याचा गौरव..

नर्मदा परिसरातील मुलांसाठी शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या भारती ठाकूर, मानवी तस्करी रोखणाऱ्या शर्मिष्ठा वालावलकर, कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ. कल्पना जोशी, देवीचे गाव तुळजापूर स्वच्छ करण्याचा वसा घेतलेल्या भारतबाई देवकर, प्राणिमत्रीण सृष्टी सोनवणे, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणारी तरुणी नासरी चव्हाण, स्वत: अंध असूनही इतर अंधांना स्वयंपूर्ण बनवणाऱ्या राधा बोरडे, आदिवासींच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉ. सुजाता गोडा आणि उद्योजिका अनुराधा देशपांडे या ‘नवदुर्गा’चा यावेळी सन्मान करण्यात आला.