‘लोकसत्ता’च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये राजकीय स्त्रीशक्तीची उपस्थिती

समाजामध्ये  विधायक कार्य घडविण्यात अनेक स्त्रियांचा पुढाकार असतो. या स्त्रिया प्रसिद्धी आणि नावलौकिकापासून दूर राहून समाजाचे ऋण फेडण्याचे काम अविरत करीत असतात. अशा नऊ  कर्तृत्ववान स्त्रियांच्या कामगिरीला, कलागुणांना आणि सामाजिक योगदानाला सलाम करण्यासाठी  ‘लोकसत्ता’च्या ‘शोध नवदुर्गाचा’ या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील स्त्री शक्ती सहभागी होणार आहे. आज सायंकाळी ६.१५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे होणाऱ्या या नवदुर्गा सत्कार सोहळ्यानिमित्ताने एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमातील यंदाच्या दुर्गाचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालविकास आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री व आमदार वर्षां गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विधान परिषद आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत ‘केसरी टूर्स’, तर ‘देना बँक, ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ आणि ‘राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायजर्स लिमिटेड’ या उपक्रमाचे सहप्रायोजक असून एम्पॉवर्ड बाय ‘निर्लेप’ आहे. नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.