सिकल सेल हा लाल रक्तपेशींचा गुणसूत्रांशी निगडित असलेला आनुवंशिक आजार असून महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाडय़ातल्या आदिवासी लोकांमध्ये मुख्यत्वे आढळतो. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन नागपूरच्या डॉक्टर अनुराधा श्रीखंडे यांनी शासनाकडे या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ हे या रोगासंबंधीचे विभागीय केंद्र बनले. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत असून आत्तापर्यंत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे चार लाख व्यक्तींची या रोगासंबंधीची रक्त चाचणी केलेली आहे. अलीकडेच त्यांची इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता (डीन) या पदावर नियुक्ती झाली असून सिकल सेलविरुद्धची मोहीमही त्यांनी तीव्र केली आहे.

नागपूरमधला आदिवासी समाज हा आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा मागासलेला असल्याने सिकल सेल हा आजार पुष्कळ वर्षे दुर्लक्षितच राहिला. पॅथॉलॉजी विषयातल्या तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्रीखंडे १९८२ पासून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडित आहेत. हिमॅटोलॉजी हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यासंबंधीच्या कोअ‍ॅग्युलेशन, हिमोग्लोबिनोपॅथी आणि  इम्युनोलॉजी अशा प्रयोगशाळा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यानुसार रुग्णांचे निरीक्षण सुरू केले तेव्हा त्यांना सिकल सेलचे बरेच रुग्ण आढळून आले. मध्य भारताला सिकल सेल आजाराचा ‘हाय रिस्क झोन’ म्हटले जाते. डॉक्टर श्रीखंडे यांच्या मते नागपूर विभागात १३ ते १८ टक्के लोक सिकल सेलने ग्रासलेले आहेत. या एवढय़ा मोठय़ा जनसंख्येसाठी व्यक्तिगत पातळीवर उपाययोजना करता येणे अवघड होते त्या दृष्टीने डॉक्टर श्रीखंडे यांनी सिकल सेलचा प्रश्न शासनाकडे नेण्याचा निर्णय घेऊन या रोगाच्या गंभीरतेची आणि व्यापकतेची जाणीव करून देण्यासाठी एक अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यामध्ये ‘रिजनल सेंटर फॉर डिटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीजची’ गरज असल्याचे सुचवले आणि त्याचा पाठपुरावा केला. त्याप्रमाणे १० जुलै २००१ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर) हे या रोगासंबंधीचे विभागीय केंद्र बनले व त्या प्रकल्प संचालक झाल्या. त्यांनी महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विभागाच्या (नागपूर) मदतीने आश्रमशाळांमधल्या मुलांमुलींची सिकल सेलसंबंधीची ‘सोल्युबिलिटी आणि हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस’ नावाची विशिष्ट चाचणी, रक्तचाचणी सुरू केली. त्यातून हा रोग असल्याचे निष्पन्न होते.

आपल्या शरीरातील निरोगी लाल रक्तपेशींचा आकार तबकडीसारखा गोल असतो. परंतु सिकल सेलमध्ये या पेशींचा आकार सिकल म्हणजे विळ्याप्रमाणे अर्धचंद्राकार बनतो. त्या लवचीक नसल्याने या पेशी रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतीवर एकावर एक चिकटून बसतात व रक्ताभिसरणात अडथळा आणतात. त्यामुळे रक्त अवरोध निर्माण होऊन अशा व्यक्तींना शरीरात सतत कुठे ना कुठे सतत वेदना होतात. वेदनाशामके घेतल्यानंतर किरकोळ तक्रारी दूर होतात. परंतु काही वेळा वेदना तीव्र होतात याला ‘पेनफुल क्रायसिस’ म्हणतात. याखेरीज फुप्फुसे, शिस्न आणि प्लीहेमधील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आल्यास तातडीचे उपचार करावे लागतात. रक्तक्षय वाढतो, कावीळ होते आणि अशा रुग्णाला वारंवार रक्त संक्रमणाची जरुरी भासते. असं वारंवार होऊ  लागले की प्लीहा शस्त्रक्रियेने काढून टाकावी लागते. प्लीहा काढून टाकल्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होऊन जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तसेच अशा रुग्णांना लसीकरण आणि प्रतिजैविके यांचा उपचार पुढील आयुष्यात कायम घ्यावा लागतोच शिवाय त्यांचा जीवनकालही मर्यादित होतो.

या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. श्रीखंडे यांनी शासनाला सात कलमी कार्यक्रम सादर केला. व त्यानुसार वयोगट १ ते ३० तसेच गर्भवती यांची सिकल सेलसंबंधीची सक्तीची रक्तचाचणी, औषधोपचार, रक्तपुरवठा मोफत देणे अनिवार्य झाले. तसेच लग्नासंबंधीचे समुपदेशन, जनजागृती, संशोधन यासाठी पुढाकार घेण्यात आला. याचाच परिणाम म्हणून दरवर्षी जनजागृतीसाठी सिकल सेल सप्ताह पाळावा आणि रुग्णांसाठी वेगळा ‘बाह्य़ रुग्ण विभाग’ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. डॉक्टर श्रीखंडे यांनी सुचवलेल्या धोरणांमुळे केवळ नागपूर विभागातीलच नाही तर राज्यातील इतर शासकीय महाविद्यालयांनासुद्धा सिकल सेलसंबंधीचे असेच आदेश दिले गेले आणि त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करण्यात आली. याबरोबरच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेही  आदेश निर्गमित होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये इथेसुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणासाठी

डॉ. श्रीखंडे दरवर्षी वैद्यकीय अधिकारी आणि तंत्रज्ञांची कार्यशाळा घेतात. परंतु कार्याचा आवाका पाहता एवढेही पुरेसे नव्हते. त्या दृष्टीने एक पाऊल म्हणून २००४ मध्ये त्यांनी ‘सिकल सेल असोसिऐशन ऑफ नागपूर’ (एससीएएन) ही अशासकीय संस्था स्थापन करून त्याद्वारेही कार्य सुरू केले.

हा आजार पूर्णपणे बरा होण्याबाबत अद्याप थेट उपचार नसल्याने डॉक्टर श्रीखंडे यांनी आपले लक्ष या आजाराचा प्रसार थोपविण्याकडे केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने लग्नाच्या वयातल्या मुला-मुलींची रक्तचाचणी करण्यासाठी शासकीय मदत घेऊन नागपूर शहर व ग्रामीण विभागातल्या सगळ्या शासकीय महाविद्यालयांत सिकल सेल रक्तचाचणी सुरू केली.  गेल्या वीस वर्षांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुमारे चार लाख व्यक्तींची या रोगासंबंधीची रक्तचाचणी केलेली असून आजही दररोज एक तरी रक्तचाचणीचे शिबीर असतेच.

परंतु हा विषय खूपच संवेदनशील आहे. आपल्याला हा आजार आहे हे इतरांना कळले तर आपले लग्नच होणार नाही, या भीतीमुळे मुली  निराश होतात. त्यांना मानसिक आधार देण्याचे, समुपदेशाकडे पाठवण्याचे कामही त्या करतात. या आजारामुळे हा वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.

सिकल सेलसारख्या गंभीर आणि व्यापक समस्येकडे सरकारचे लक्ष वेधून जरूर ते धोरण आखून घेऊन त्यानुसार प्रशासकीय व्यवस्थेसाठी उद्युक्त करणे हे प्रचंड आव्हान यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या डॉक्टर श्रीखंडे यांना आमचा दंडवत!

अंजली श्रोत्रिय