मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या डॉ. प्रतिभा फाटक यांच्यातल्या संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करत होत्या, ग्रामीण जनतेला समाधानी आयुष्य द्यायचे असेल तर त्याच्यात आरोग्यभान जागृत करण्याबरोबरच आर्थिकभान देणंही गरजेचे होते. म्हणूनच औरंगाबादच्या ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या माध्यमातून त्यांनी विकासाची गंगा आणली. बचत गटाच्या स्थापनेमुळे असंख्य ग्रामीण स्त्रिया आर्थिक स्वतंत्र झाल्या असून त्या गावांमधील सावकारी पूर्णपणे बंद झाली आहे. जिल्ह्य़ातल्या ५६ गावांत केवळ वैद्यकीय उपचार न करता त्याला जनजागृती व आरोग्य शिक्षणाची जोड देणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, डॉ. प्रतिभा फाटक.

Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

मराठवाडय़ातील औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री व गंगापूर तालुक्यात ग्रामीण आरोग्यसेवा व आरोग्य शिक्षण यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ डॉ. प्रतिभा फाटक चिकाटीने काम करत आहेत. डॉ. फाटक या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या संस्थापक सदस्य असून त्याद्वारे त्या मराठवाडय़ाच्या ग्रामीण भागात गेली २३ वर्षे कार्यरत आहेत. आज येथील स्त्रिया, मुले, एकूणच ग्रामीण जनतेत आरोग्यभान येऊ लागले आहे,  सामाजिक भान असणारा एक डॉक्टर विकास कसा घडवू शकतो हे त्यांच्या उदाहरणाने सिद्ध व्हावे.

डॉ. फाटक या मूळच्या देगलूरच्या (नांदेड) राहणाऱ्या असून आपले बीएएमएसपर्यंत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच म्हणजे १९९३ मध्ये त्या औरंगाबादमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या कामात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या आणि त्याच दरम्यान झालेल्या लातूर भूकंपाने व्यापक वैद्यकीय मदतकार्य करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे केले. तो त्यांच्या दृष्टीने वैयक्तिक आयुष्याला वळण देणारा प्रसंग ठरला आणि त्यांनी आयुष्यभरासाठी ग्रामीण जनतेच्या वैद्यकीय सेवेला वाहून घ्यायचे ठरवले. सुरुवातीच्या टप्प्यात दीड र्वष धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी भागात आणि नंतर औरंगाबादमधील झोपडपट्टी परिसरात त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. मराठवाडय़ाच्या ग्रामीण भागातील आरोग्य व ग्रामीण विकासविषयक कामांवर अधिक भर देण्याच्या दृष्टीने १९९४ च्या सुमारास स्थापन झालेल्या सावित्रीबाई फुले एकात्म महिला मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या एक आहेत. आज ही गावं विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

ग्रामीण स्त्रियांचे आरोग्य हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. त्यासाठी गेली २० वर्षे त्या आठवडय़ातून किमान चार ते पाच दिवस दररोज सकाळी औरंगाबाद जिल्ह्य़ातील ग्रामीण आरोग्य केंद्रावर जातातच. तेथील ५६ गावांत सुरू असणारे काम म्हणजे केवळ उपचार नसून त्याला त्यांनी जनजागृती व आरोग्य शिक्षण याची महत्त्वाची जोड दिली आहे. त्यासाठी महत्त्वाची पावले त्यांनी उचलली. गावातल्याच आरोग्य सेविका निवडून त्यांना रीतसर प्रशिक्षण तर दिलेच, पण पारंपरिक पद्धतीने गावात प्रसूती पार पडणाऱ्या दाईंनाही प्रशिक्षित केले. त्यांच्या साह्य़ाने बालकुपोषणमुक्ती, नवदाम्पत्यांना आरोग्य प्रशिक्षण यावर त्यांनी भर दिला. या आरोग्य प्रशिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून डॉ. प्रतिभा यांनी पुढाकार घेऊन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र सावित्रीबाई फुले एकात्म महिला मंडळाशी सलग्न असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे सुरू केले. ५६ गावांतील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने ‘उज्ज्वल भारत’ हा उपक्रम सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी अस्वस्थ झालेल्या डॉ. प्रतिभा यांनी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले. औरंगाबाद जिल्ह्य़ातल्या स्त्रियांना स्वावलंबी, आत्मनिर्भर मुख्य म्हणजे आर्थिक स्वतंत्र बनवण्यासाठी आपल्या संस्थेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न केले तेही गेल्या दहा वर्षांपासून. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात तीन तालुक्यांतील २२ गावांमध्ये १६५ महिला बचत गट स्थापन केले असून त्यामुळे अडीच हजार कुटुंबं जोडली गेली आहेत. इतकेच नव्हे तर ४३ गावांतील चार हजारांहून अधिक ग्रामीण गरीब स्त्रियांना त्यांनी विमा काढून दिला आहे. बचतगट चालणाऱ्या गावांमधील सावकारी आता पूर्णपणे बंद झाली आहे. चिंचोली गावातल्या स्त्रियांनी संपूर्ण ग्रामपंचायत आपल्या ताब्यात मिळविली आणि तीही बिनविरोध! डोणवाडा गावातील बचत गटाने अंगणवाडीस पोषक आहार पुरविण्याचे काम घेतले आणि पाठपुरावा करून बावीस कुपोषित मुलांना कुपोषणाच्या छायेतून बाहेर काढले. सुजाता बचत गटाने तर गटातील स्त्रियांना अ‍ॅनेमिया मुक्त केले. मोरदरा गावातील गटातील १२ जणींनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला शिवाय सामूहिक पिठाची गिरणी थाटली. एकेकटय़ा स्त्रियांनी तर बचत गटातून कर्ज घेऊन अनेक छोटे छोटे उद्योग सुरू केले. कुणी बांगडय़ांचे दुकान थाटले, कुणी शेळ्यांचा व्यवसाय करून त्यातील नफ्यावर स्वत:च्या नावावर शेत विकत घेतले, कुणी फुलशेतीचे प्रयोग केले, कुणी गांडूळ खताचे यंत्रणा उभारली, कुणी आपल्या मुलीच्या शिक्षणाची तरतूद केली. मोठय़ा प्रमाणातील थकबाकीमुळे बँकेच्या काळ्या यादीत असलेल्या आंबेगावातील बचत गटाने गावाला परतफेडीची सवय लावून गमावलेली पत मिळवून दिली. याच गावातील स्त्रियांनी गटाद्वारे खताचे दुकान चालू केले. या स्त्रिया जेव्हा खताच्या ट्रकमध्ये बसून गावात आल्या तेव्हा बँक अधिकाऱ्यांसह ग्रामस्थही अचंबित झाले. साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या या मराठवाडय़ाच्या गावांमधील यशोगाधा  वेगळी उमेद जागविणाऱ्या आहेत यात शंका नाही.

दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन इथल्या स्त्रियांना आधुनिक शेतीचे धडे देण्यासाठी दोन वर्षांपासून ‘कृषिकन्या प्रकल्प’ सुरू आहे. त्याद्वारे १५ गावांतील ७५० स्त्रिया प्रशिक्षण घेत असून २१० जणींनी मका, बाजरी व तूर या पिकांसाठी यंदा पहिल्यांदाच बीजप्रक्रिया केली हे विशेष. याशिवाय २५० स्त्रियांनी आपल्या अंगणात परसबाग फुलविली आहे.  पावसाळ्यात भाज्या मुबलक मात्र उन्हाळ्यात त्या न परवडणाऱ्या होतात त्यावर उपाय म्हणून सावित्रीबाई फुले एकात्म महिला मंडळातर्फे आठ गावांतील २०० स्त्रियांना मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र-जैवतंत्रज्ञान विभाग, बिल व मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्यातून सौर वाळवण यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. इतकेच नव्हे तर यंत्रे दिलेल्या २०० आणि यंत्रे न दिलेल्या २०० अशा एकूण ४०० स्त्रियांची वजन, उंची व रक्ताची वेळोवेळी तपासणी करून स्त्रियांच्या आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा डॉ. फाटक यांनी संशोधनाच्या अंगाने अभ्यास केला व त्यानुसार वैद्यकीय उपाय योजना केल्या.

त्यांचे हे कार्य पाहूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळाचा सत्कार केला. मात्र त्याने न थांबता गावविकासासाठी स्वत:लाही बौद्धिकदृष्टय़ा वाढवण्यासाठी डॉ. प्रतिभा यांनी एम. ए. (रुरल डेव्हलपमेंट) तसेच ‘पब्लिक हेल्थ’ या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एम. पी. एच अभ्यासक्रमही पूर्ण केला. ग्रामीण विकासासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या या दुर्गेला आमचा सलाम!