28 May 2020

News Flash

नेमबाजीतील तेज

औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री या गावात जन्मलेली तेजस्विनी मुळे-लांडगे!

तेजस्विनी मुळे-लांडगे

औरंगाबादमधील फुलंब्रीसारख्या तितक्याशा प्रगत नसलेल्या तालुक्यात राहणाऱ्या तेजस्विनीने नेमबाजीचे स्वप्न पाहणे म्हणजे तसे अवघड ‘लक्ष्य’. पण तिने ते स्वप्न फक्त पाहिलेच नाही, तर पूर्ण करण्यासाठी अडथळ्यांवर मात करत परिश्रमही घेतले. त्यातूनच राज्यस्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या स्पर्धामध्ये तिने पदकांचे शतकही पूर्ण केले आहे. संसार सांभाळून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचे आव्हान पेलत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे स्वप्न पाहाणारी आजची दुर्गा आहे, तेजस्विनी मुळे-लांडगे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री या गावात जन्मलेली तेजस्विनी मुळे-लांडगे! अनेक अडथळ्यांवर मात करीत तिने नेमबाजीत करिअर सुरू केले आणि आज राज्य स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या अनेक स्पर्धामध्ये बाजी मारत तिने पदकांचे शतकही पूर्ण केले आहे. दहा मीटर एअर रायफल व ५० मीटर रायफल

थ्री पोझिशन या क्रीडा प्रकारांमध्ये ही नेत्रदीपक वाटचाल करताना तिने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडूचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या तेजस्विनीचं कर्तृत्व म्हणूनच मोठं.

राजवर्धनसिंह राठोडने २००४ मधील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक तर अभिनव बिंद्राने २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर नेमबाजी या खेळात ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचता येते व करिअरही करता येते याची जाणीव भारतीयांमध्ये झाली. तरीही नेमबाजीसाठी रायफल्स, दारुगोळा व अन्य साधने सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी मध्यमवर्गीय खेळाडूंना व त्यांच्या पालकांना त्याकरिता भरपूर त्याग करावा लागतो. अशा खेळाडूंमध्येच तेजस्विनीचा समावेश आहे. त्याचमुळे तिचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. फुलंब्री हे आता तालुक्याचे ठिकाण असले तरी साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी ते फारसे प्रगत नव्हते. तेजस्विनीचे वडील मनोज यांना नेमबाजीची आवड आहे. रात्री जागून ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा पाहण्याची त्यांना हौस होती. पूर्वी या खेळास फारसे महत्त्व नव्हते आणि रायफल्स किंवा बंदुकाही उपलब्ध होत नसत. तसेच आर्थिकदृष्टय़ाही ते परवडणारे नव्हते. म्हणूनच आपलं नेमबाज बनण्याचं स्वप्न त्यांनी तेजस्विनीमध्ये बघायला सुरुवात केली.

औरंगाबाद येथे २००३ मध्ये नेमबाजीचे वासंतिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तेजस्विनीने भाग घेतला. त्या वेळी ती जेमतेम ११ वर्षांची होती. रायफल हातात पेलविणेही तिच्यासाठी आव्हान होते. मात्र कमालीची जिद्दी असलेल्या तेजस्विनी हिने हे आव्हानही पेलले व यशस्वीरीत्या हे शिबीर पूर्ण केले. तिच्याकडील नेमबाजीचे कौशल्य पाहून तिच्या वडिलांनी तिला औरंगाबाद येथील अकादमीत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. कारण त्यासाठी तेजस्विनीला औरंगाबादच्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागणार होता. पण जिद्द होती. तिने औरंगाबादला होस्टेलमध्ये राहाण्याचे मान्य केले. २००३ ते २००६ या कालावधीत राहुल पटवर्धन व पी.व्ही.कुलकर्णी यांच्याकडून तिला नेमबाजीचे बाळकडू लाभले. २००७ मध्ये पहिल्यांदाच तिला राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. कनिष्ठ गटाच्या या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर तिच्या नेमबाजीच्या करिअरला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. त्यानंतर तिने मागे पाहिलेच नाही. अर्थात हे करिअर करायचे असेल तर चांगली रायफल आवश्यक आहे. तिच्या पालकांनी त्या वेळी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. तेजस्विनीला लहान भाऊही आहे. त्याचे शिक्षण व अन्य कौटुंबिक खर्चाकरिता आर्थिक तरतुदी करीत एकीकडे या कर्जाची परतफेड करणे सोपे नव्हते. तेजस्विनीबरोबर सोबत म्हणून वडिलांनाही त्या ठिकाणी जावे लागत असे. तसेच वेळोवेळी विविध स्पर्धासाठी परगावचा प्रवास करणे, तेथील निवास व भोजन व्यवस्था, अन्य खर्चाकरिता आर्थिक मोट बांधणेदेखील जिकिरीचे होते. परंतु तेजस्विनीच्या एका मागोमाग मिळणाऱ्या यशामुळे पालकांनीही अनेक गोष्टींचा त्याग केला आणि त्याची जाण ठेवत तेजस्विनीही मेहनत घेत यशस्वी होत राहिली.

पुण्यात २००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी आपल्याला संधी मिळायला पाहिजे, या हेतूने तेजस्विनी हिने एकाग्रतेने सराव केला. जिद्द व कठोर मेहनत याच्या बळावर आणि अनेक पात्रता स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे तिला या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सांघिक स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले. हे पदक स्वीकारताना तिरंगा ध्वज फडकला. त्यावेळी तिला आणि तिच्या पालकांना मिळालेला आनंद अवर्णनीय होता. देशासाठी आपल्याला काही करता आले याचा तो आनंद होता.

तेजस्विनीच्या करिअरची पायाभरणी तेथे झाली. एअर रायफल व रायफल थ्री पोझिशन अशा दोन्ही क्रीडा प्रकारात भाग घेण्यास तिने सुरुवात केली होती. जागतिक स्तरावर यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनत करणे अनिवार्य असते. भारतीय खेळाडूंकरिता परदेशी प्रशिक्षक होते. हे प्रशिक्षक कमालीचे शिस्तप्रिय असतात. थ्री पोझिशनच्या स्पर्धेसाठी जरी २०-२५ मिनिटे लागत असली तरी सरावाच्या वेळी कमीत कमी पाऊण तास थ्री पोझिशन राहण्याचा सराव ते करून घेत असत. दिवसातून तीन चार वेळा असा सराव करणे म्हणजे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची कसोटीच असे. तेजस्विनीने ही कसोटी पार पाडली.

जागतिक स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठीही अनेक चाचणी स्पर्धामधून जावे लागते. त्यात चुका होणंही खेळाचाच एक भाग असतो. २०१० मध्ये गुवाहाटी येथील चाचणीच्या वेळी तेजस्विनी हिच्याकडून नकळत चूक झाली व त्यामुळे तिला दहा गुण गमवावे लागले. तिला अक्षरश: रडू कोसळले. मात्र वडिलांनी धीर दिला आणि तेजस्विनीचा आत्मविश्वास वाढला. ठाम निर्धार करत, मेहनतीने तिने नंतरच्या चाचणी स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली.

विविध स्पर्धासाठी रायफल्स व अन्य साधने नेताना विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थांचा सोपस्कार पार पाडणे हे बहुतांश नेमबाजांकरिता कठीण काम असते. तेजस्विनीलाही अनेक वेळा याबाबत कडूगोड प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच तिला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली

आहे. त्यामुळे तिचा आर्थिक भार हलका झाला आहे. नुकताच तिला जीवनाचा जोडीदारही लाभला आहे. संसार सांभाळून क्रीडा क्षेत्रात करिअर करणे हे भारतीय स्त्रीसाठी नेहमीच आव्हान असते. मात्र तेजस्विनीला सासरच्या मंडळींची चांगली साथ लाभली आहे. या प्रवासात तिच्या सासूबाई आणि पती राहुल यांची तिला सक्रिय साथ मिळते. त्यामुळेच तिला आगामी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

आर्थिक परिस्थितीवर मात करत कठोर मेहनतीने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे शतक पूर्ण करणाऱ्या तेजस्विनीला मानाचा सलाम!

तेजस्विनी मुळे-लांडगे

९४२३३९४८६६

tejaswini.mule@gmail.com

‘लोकसत्ता दुर्गा २०१७’चे टायटल पार्टनर  आहेत केसरी.

या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत देना बँक, व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स आणि राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायजर्स  लिमिटेड.

एम्पॉवर्ड बाय निर्लेप.

नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2017 4:43 am

Web Title: loksatta navdurga program 2017 tejaswini muley landage
Next Stories
1 ‘ओला-उबर’मुळे एसी बस बंद
2 मरिन ड्राइव्हला जागतिक वारसा देण्यावरून नाराजी कायम
3 बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या शोधासाठी ‘एसआयटी’!
Just Now!
X