राजकारण, समाजकारण ढवळून काढणाऱ्या, कला-नाटय़-वाङ्मय क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या, नवविचारांची बीजे रोवणाऱ्या ओजस्वी वक्त्यांची देदीप्यमान परंपरा महाराष्ट्राला आहे. कालौघात ही परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली. त्याच तेजस्वी परंपरेचे, वक्तृत्वाच्या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे या हेतूने लोकसत्ताने सुरू केलेल्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष. गेल्या वर्षीच्या स्पर्धेला राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-वक्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच, परंतु जाणकार श्रोत्यांनीही त्याला भरभरून दाद दिली. त्या प्रतिसादांची, अनुभवांची शिदोरी घेऊनच या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला येत्या १८ जानेवारीपासून सुरुवात करण्यात येत आहे.
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतून महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’ निवडला जाणार आहे. ‘जनता बँक’ सहप्रायोजक असलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा १८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडेल. या विभागीय प्राथमिक फेरीनंतर, विभागीय अंतिम फे रीचे आव्हान पूर्ण करून पुढे येणारा प्रत्येक केंद्रातील एकेक विद्यार्थी असे आठ विद्यार्थी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फे रीत सहभागी होतील. या आठ जणांमधून महाराष्ट्राचा ‘वक्ता ‘वक्ता दशसहस्रेषु’ पहिल्याच पर्वाला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला होता.’ निवडला जाईल.
‘वक्ता दशसहस्रेषु’च्या पहिल्याच पर्वाला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला होता. राज्यभरातून पाचशे स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहिल्या प्रयत्नातही अनेक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने दिलेल्या विषयांवर आपले विचार मांडले होते. धर्म, लिव्ह-इन-रिलेशनशिप, बॉलीवूड अशा अनेक विषयांवर आपली मते मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना, ‘आत्मविश्वासाबरोबरच तुमच्याकडे असलेले विचारधन आणि त्याची मुद्देसूद, प्रभावी मांडणी महत्त्वाची असते,’ असा यशाचा कानमंत्रही मान्यवर मार्गदर्शकांनी दिला होता. या स्पर्धेच्या अटी, नियम, विषय आदी तपशीलही लवकरच ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या माध्यमातून स्पर्धकांपर्यंत पोहोचतील.