‘लोकसत्ता’चा नवा उपक्रम; ज्ञानवर्धनाबरोबर धम्माल रंजक वेब-कृती-संवाद

मुंबई : करोनाच्या महासाथीमुळे गेले वर्षभर घरात राहूून ‘सुट्टी’ या संकल्पनेतील आनंद सगळीच लहान मुले विसरून गेली आहेत. एरव्ही मे महिन्याचा रखरखाट असतानाही दुर्गभ्रमंतीपासून गावातील आंब्या-फणसांच्या आस्वादात रमणारी, गारेगार सरबतांसह बर्फाच्या गोळ्यांशी गट्टी करणारी चिमुकल्यांची फौज सोसायट्यांच्या आवारात कल्ला करण्याची स्पर्धा करताना दिसे. सध्या घरांच्या चार भिंतींमध्ये दिवसच्या दिवस हिरमुसल्या मनाने रेंगाळणाऱ्या  बाल-गोपाळांना ज्ञानवर्धनासह प्रदीर्घ वेळेचे सोने करण्याचे धडे देणारा ‘मधली सुट्टी’ हा अभिनव उपक्रम ‘लोकसत्ता’ घेऊन आला आहे.

चार दिवस चालणाऱ्या या वेब-कृती-संवादात चित्र आणि ओरिगामी या कला आत्मसात करण्याची हातोटी विद्यार्थ्यांना शिकता येईल. आपल्या आकाशमालेच्या अंतरंगातील रहस्यांची रंजक माहिती ज्ञात होईल. तसेच बालकांच्या मन:स्वास्थाची सद्य:स्थितीत काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन पालकांना मिळेल. एकूणच हसत-खेळत ज्ञान आत्मसात करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.

करोना काळात समाजातील तारांकित व्यक्तींशी ऑनलाइन गप्पा रंगवण्यापासून ते महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राची विविधांगी ओळख  करून देणाऱ्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेपर्यंत वैचारिक, सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन ‘लोकसत्ता’ने के ले. बाल-गोपाळांसाठी हा पहिलाच उपक्रम आहे.

मुलांची ‘मधली सुट्टी’ सार्थ करायची तर त्यात पालकांचाही सहभाग तितकाच मोलाचा असेल. त्यामुळे मुलांना गमतीजमतीतून गोष्टी उलगडून सांगत असताना पालकांशीही संवाद साधण्याची जबाबदारीही या उपक्रमातून पार पाडली जाईल. मुले आणि पालकांच्या सक्रिय, सर्जनशील सहभागातून या लांबलेल्या सुट्टीत ज्ञानवर्धक, मनोरंजक आणि कलात्मक गोष्टी शिकण्या-शिकवण्याचा प्रयोग याद्वारे केला जाणार आहे.

अद्भूत आणि गमतीदार…

१९  मे रोजी ग्रहताऱ्यांच्या विश्वाची सफर मुंबईतील नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे घडवतील. २० मे रोजी ओरीगामीतील सहज-सोप्या कृती श्रीराम पत्की दाखवून देतील. २१ मे रोजी रंग आणि आकृत्यांशी मैत्री कशी करावी याविषयी निलेश जाधव चिमुकल्यांचा चित्रकलेचा तास घेतील. तर २२ मे रोजी ‘करोना काळातील पालकत्व’ यावर बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप के ळकर मोलाचे मार्गदर्शन करतील.

होणार काय?

लहान मुलांच्या विश्वाात डोकावत त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम ‘मधली सुट्टी’च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने पहिल्यांदाच आखला आहे. १९ मे ते २२ मेदरम्यान दररोज संध्याकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होईल.

या उपक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, आहेत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी    http://tiny.cc/LS_Madhali_Sutti येथे नोंदणी आवश्यक. या क्यूआर कोडवरूनही सहभागी होता येईल.