‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाची एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ म्हणून गौरवली जाण्यासाठी आता अखेरची संधी आहे.‘अस्तित्व’ संस्थेच्या मदतीने राज्यभरात पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज, २५ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक असून स्पर्धेदरम्यान आपले कलागुण दाखवणाऱ्या कलाकारांना भविष्यातील उत्तमोत्तम संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रोडक्शन्स’ हे ‘टॅलेण्ट पार्टनर’ म्हणून काम करतील. २० डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण नंतर ‘झी मराठी’वरील ‘नक्षत्र’ या कार्यक्रमातून होईल.
‘सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत’ आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत अभिनय, दिग्दर्शन, लेखन, संगीत अशा विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या पारितोषिक विजेत्यांना एकूण साडेतीन लाख रुपयांची पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. महाअंतिम फेरीत महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ ठरणाऱ्या एकांकिकेला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येईल.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, रत्नागिरी आणि नागपूर या आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्यासाठी मंगळवार २५ नोव्हेंबर हा अंतिम दिवस आहे. या आठही केंद्रांवर होणाऱ्या प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्या एकांकिकांची केंद्रीय अंतिम फेरी या आठ केंद्रांवरच पार पडेल.
या प्रत्येक केंद्रावरील सवरेत्कृष्ट एकांकिकांमधून महाअंतिम फेरीतून एक एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ म्हणून निवडली जाईल. या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक असलेल्या झी मराठीवरील ‘नक्षत्र’ या कार्यक्रमात होणार आहे.

या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी
www. loksatta.com/lokankika या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर प्राथमिक फेरीपासून ते महाअंतिम फेरीपर्यंत सर्व वेळापत्रक, स्पर्धेचे नियम आणि अटी आणि प्रवेश अर्जही उपलब्ध आहेत.