‘वक्ता दशसहस्त्रेषु’चे पाचवे पर्व लवकरच

सर्वच क्षेत्रांत चौफेर फटकेबाजी करणाऱ्या, नवविचारांची बीजे रोवणाऱ्या ओजस्वी वक्त्यांची देदीप्यमान परंपरा महाराष्ट्राला आहे. या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ स्पर्धेचे यंदा पाचवे पर्व लवकरच सुरू होणार आहे.

चांगला वक्ता दहा हजारांत एखादाच आढळतो, असे म्हटले जाते. महाराष्ट्राने आजवर अनेक उत्तमोत्तम ओजस्वी वक्तेदिले आहेत. एके काळी राजकारण असो की कला वा वाङ्मय, समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक उत्तमोत्तम वक्ते सहज दिसून येत. मात्र काळाच्या ओघात वक्तृत्वाची ही परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली आहे. या परंपरेचे पुनरुज्जीवन व्हावे आणि चांगले वक्ते घडावेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सहप्रायोजक श्री धूतपापेश्वर, पॉवर्ड बाय वास्तुरविराज असलेली ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी होणार आहे. या प्रत्येक केंद्रातून विभागीय विजेते निवडले जातील. त्यानंतर महाअंतिम फेरीतून ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ ठरणार आहे. महाअंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांना विविध क्षेत्रांतील वक्त्यांचे खास मार्गदर्शन मिळणार आहे. त्यातून त्यांचा महाअंतिम फेरीतील भाषणाचा विषय निश्चित करण्यात येईल. स्पर्धेसाठीच्या भाषणांचे विषय आणि सविस्तर नियम, अटी आदी तपशील लवकरच जाहीर केला जाईल.