‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील स्पर्धकांना रश्मी वारंग आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा सल्ला

कोणाच्याही वक्तृत्व शैलीचे अनुकरण न करता स्वत:च्या शैलीत बोला. चांगला वक्ता होण्यासाठी विविध वक्त्यांची भाषणे ऐका, दररोज बोलण्याचा सराव ठेवा आणि वाचन, मनन, अभ्यास आणि चिंतन करा, असा सल्ला ‘रेडिओ जॉकी’ रश्मी वारंग आणि अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील स्पर्धकांना दिला, तर जो विषय सादर करायचा आहे त्यावरील स्वत:चे मत आणि विचार आत्मविश्वासाने मांडून ते निर्भीडपणे श्रोते आणि परीक्षकांपर्यंत पोहोचवा, अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

आज, शुक्रवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे ‘लोकसत्ता वक्तादशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत ‘महाराष्ट्राचा वक्ता’ ठरणार आहे. राज्यभरातील विभागीय स्पर्धामधून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आठ स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात गुरुवारी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रश्मी वारंग आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी स्वतंत्र सत्रात या स्पर्धकांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यशाळेचा समारोप ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत झाला. आवाजाचा वापर, शब्दफेक, रियाज, आवाज सुधारण्यासाठी करावयाचे उपाय, स्पर्धेत भाषण करताना घ्यावयाची काळजी, वक्तृत्व स्पर्धेत भाषण करताना काय करावे आणि काय करू नये, गोंधळात टाकणारे शब्द आणि आनुषंगिक बाबींविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी बोलताना रश्मी वारंग यांनी सर्व स्पर्धकांना त्यांच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला दिला. ‘‘महाअंतिम फेरीतील माझे सादरीकरण उत्तमच होणार आहे. कोणतीही चूक माझ्याकडून होणार नाही, असा सकारात्मक विचार करा. भाषण करताना शब्द आणि वाक्यांची निवडही काळजीपूर्वक करून नकारात्मक विचार मांडू नका,’’ असे वारंग म्हणाल्या.

संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी चांगला वक्ता होण्यासाठी नृत्यकार, गायक यांच्याप्रमाणे दररोज आवाजाचा रियाज करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ‘‘मार्गदर्शक वक्त्याची निवड डोळसपणे करा. भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट आकर्षक, प्रभावी आणि सकारात्मक करा,’’ असे आवाहन त्यांनी स्पर्धकांना केले. गिरीश कुबेर यांनी स्पर्धकांना ‘भाषण किंवा बोलणे कोणत्या शैलीतील आहे त्याची अगोदर माहिती करून घ्या’ असा सल्ला दिला. ‘‘भाषण करताना आपण जे विचार किंवा मत मांडणार आहोत ते खणखणीतपणे व्यक्त करा. आपण जे मत/विचार मांडणार आहोत तो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्वत:ला पटलेला असला पाहिजे. तसे जर असेल तरच तो विचार तुम्ही अधिक प्रभावीपणे श्रोत्यांसमोर सादर करू शकाल,’’ असे ते म्हणाले.

तिसरे वर्ष

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर सहकारी बँक लि.-पुणे’, एमआयटी-औरंगाबाद, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी-औरंगाबाद) ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे.

 

वक्तृत्व कार्यशाळेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

मुंबई : वक्तृत्व म्हणजे काय, भाषण करताना वक्त्याने कोणते भान बाळगले पाहिजे तसेच भाषण करताना आवश्यक असलेली समयसूचकता या विषयांसह महाअंतिम फेरीत उतरण्यासाठीचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठीही ही कार्यशाळा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील स्पर्धक विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना व्यक्त केले. राज्यभरातील आठ केंद्रांवर झालेल्या विभागीय अंतिम फेरीतून पहिल्या आलेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. हे सर्व आठ स्पर्धक गुरुवारी मुंबईत झालेल्या विशेष कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेनंतर सर्व स्पर्धकांनी मनोगत मांडले.

  • भीती कमी झाली

शुक्रवारी होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा खूप मोठा फायदा झाला. आत्मविश्वास आणि स्पर्धेसाठी नेमकी तयारी कशी करायची याचे मार्गदर्शन मिळाले. मनातील भीती कमी झाली आणि महाअंतिम फेरीसाठी मी सज्ज झाले. विषय आणि विचार लोकांच्या मनापर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रयत्न करेन.   – प्रिया तरडे, (मुंबई विभाग) रुपारेल महाविद्यालय

  • छोटय़ा गोष्टींचे महत्त्व

ज्या सामान्य गोष्टींकडे दुर्लक्ष करत आले त्याच गोष्टींकडे कसा भर द्यायचा हे या कार्यशाळेतून समजण्यास मदत झाली. ही स्पर्धा जिंकणे म्हणजे महाराष्ट्रभर नाव होणे असे आहे. त्यामुळे स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने उद्याचे सादरीकरण करण्याचा माझा प्रयत्न असेल.  – आकांक्षा चिंचोलकर, (औरंगाबाद विभाग) देवगिरी महाविद्यालय

  • वैचारिक लाभ झाला!

या कार्यशाळेतून वक्तृत्वाची बाराखडी समजण्यास मदत झाली. वक्ता कसा असावा यापेक्षा नेतृत्व करणारा वक्ता कसा असावा हे लक्षात आले. उद्याचा निकाल काहीही लागला तरी हरकत नाही. कार्यशाळेच्या माध्यमातून वैचारिक लाभ मिळाला ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. उद्याच्या महाअंतिम फेरीसाठी सगळ्यांचे पाठबळ आहे.    – शंतनू रिठे (पुणे विभाग) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

  • चौकटीबाहेरची कार्यशाळा

ही साचेबद्ध अशी ‘कार्यशाळा’ नव्हती, तर व्यक्तिगत आणि आपलेपणाने साधलेला संवाद होता. आमच्या अडचणी समजून घेतल्या आणि न्यूनगंडावर कशी मात करायची हे शिकायला मिळाले. निरीक्षण आणि अनुभवाच्या माध्यमातून उद्याची स्पर्धा जिंकायची तयारी सुरू आहे.   – श्वेता भामरे (नाशिक विभाग) के.टी.एच.एम. महाविद्यालय

  • खऱ्या अर्थाने घडलो!

‘शोध श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या वक्त्याचा’ हे स्पर्धेचे ब्रीदवाक्यच माझ्यासाठी सर्वेसर्वा आहे. भाषेपेक्षा विचारांना महत्त्व आहे हे इथे येऊन कळले. उद्याचा निकाल काही लागला तरी या कार्यशाळेतून मी खऱ्या अर्थाने घडलो असे मला वाटते.   – आदित्य वडवणीकर, (अहमदनगर विभाग) रावबहाद्दूर नारायणराव बोरावके महाविद्यालय

  • ‘लोकसत्ता’ खुले व्यासपीठ

वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांसाठी अशा प्रकारची कार्यशाळा घेणे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या मोठय़ा स्पर्धेत सहभागी होणे हे स्वप्न ‘लोकसत्ता वक्तृत्व’ स्पर्धेच्या निमित्ताने सत्यात उतरले आहे. कोणत्याही बंधनाशिवाय बोलण्याचे व्यासपीठ फक्त ‘लोकसत्ता’च देऊ शकते.   – मंथन बिजवे (नागपूर विभाग) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला</strong>

  • निर्भीड मतमांडणीसाठी उपयोगी

फक्त वक्तृत्व स्पर्धेसाठी म्हणून नाही तर पुढील आयुष्यासाठी शिदोरी म्हणून उपयोगी पडेल, अशी आजची कार्यशाळा होती. ज्या एका विषयावर समाज भाष्य करतो अशा विषयांवर उद्या आम्ही आमचे मत मांडणार आहोत आणि हे मत निर्भीडपणे कसे मांडायचे याची आज सुरुवात झाली. उद्याचे वक्तृत्व चौकटीबाहेर जाऊन मांडण्याचा मी प्रयत्न करेन.   – मैत्रेयी बांदेकर, (रत्नागिरी विभाग) गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

  • गैरसमज दूर

वक्तृत्वाविषयीचे सर्व समज आणि गैरसमज दूर झाले. महाअंतिम फेरी जिंकणे हे खूप अवघड आहे. आत्तापर्यंत आपण जे केले त्याची प्रचीती उद्या येईल. थोडक्यात ‘पेरले ते उगवेल’ असे मी म्हणेन. विचार आणि ज्ञानाच्या बळावर मी महाअंतिम फेरीसाठी प्रयत्न करत आहे.   – प्रज्ञा पोवळे (ठाणे विभाग) जोशी-बेडेकर महाविद्यालय

 

चांगला वक्ता होण्यासाठी मार्गदर्शकांच्या टिप्स

रश्मी वारंग

  • आवाजाचा सुयोग्य वापर करून तुमचे भाषण प्रभावी कसे होईल याकडे लक्ष द्या.
  • भाषण करताना वाक्यातील क्रियापदे कधी गाळू नका. वाक्याच्या पूर्णविरामापर्यंतचे शब्द योग्यप्रकारे उच्चारा.
  • भाषणाला उभे राहिल्यानंतर ध्वनिक्षेपकाशी स्वत:ला जुळवून घ्या. ध्वनिक्षेपकापासून आपले तोंड लांब जाणार नाही याची बोलताना काळजी घ्या, नाही तर भाषणातील काही वाक्ये किंवा शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचणार नाहीत.
  • बोलण्याच्या ओघात आवंढा किंवा तोंडात जमा होणारी लाळ नेमकी कधी व कशी गिळायची तिकडेही लक्ष द्या.
  • कधी कधी अचानक बोलताना पुढे काय बोलायचे ते विसरायला होते आणि आपण गोंधळून जातो. भाषणातील पुढील मुद्दा कोणता असणार आहे, ते मनाशी अगोदर ठरवून ठेवा.
  • भाषण करताना नजर सर्वत्र फिरवीत बोला.
  • दररोज किमान एका मराठी आणि एका इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन करा. कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर आणि उत्तम मराठी ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात असते. आवाजाचा व्यायाम व सरावासाठी या वृत्तपत्राचा ‘अग्रलेख’ दररोज वाचा.
  • बोलताना आपला आवाज कर्णकर्कश होणार नाही याची खबरदारी बाळगा. स्वत:चा आवाज ध्वनिमुद्रित करून ऐका आणि झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा.

संपदा जोगळेकर-कुलकर्णी

  • प्रभावी आणि उत्तम भाषण होण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंपत्ती मोठय़ा प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्याकरिता वाचन हे आवश्यक आहे. त्याचबरोबर हे शब्द आणि भाषा आपलीशी करा.
  • तुमच्या भाषेची शैली वेगळी असेल तर त्याबद्दल कमीपणा मानून घेऊ नका. इतरांपेक्षा ती वेगळी असल्यामुळे तुमच्यासाठी ती संधी आहे असे समजा. तुमच्या स्वत:च्या शैलीत आणि पट्टीतच बोला. कोणाचे अनुकरण करू नका.
  • भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी दीर्घ श्वसन करा. यातून तुम्हाला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळेल आणि त्यामुळे मनावर आलेले दडपण व ताण नाहीसा होण्यास नक्कीच मदत होईल.
  • तुम्ही मांडणारा विषय गंभीर, वैचारिक, विनोदी आहे यावर काहीही अवलंबून नसते, तर तुमच्या भाषणातून तुम्ही जो विचार आणि जो आशय व्यक्त करता तो सर्वात महत्त्वाचा असतो.
  • भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट चांगला आणि परिणामकारक कसा होईल याकडेही लक्ष द्या. तुम्ही सादर करणार असलेल्या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाचे असे आठ ते दहा मुद्दे मनाशी नोंद करून ठेवा किंवा एखाद्या छोटय़ा कागदावर त्याचे टिपण तयार करा.
  • भाषणात फापटपसारा न आणता मुद्देसूद आणि विषयाला धरून बोला. तुमच्या बोलण्यातून तळमळ दिसली पाहिजे.

गिरीश कुबेर

  • भाषण करताना आपण जे विचार किंवा मत मांडणार आहोत ते खणखणीतपणे व्यक्त करा.
  • भाषण सुरू केल्यानंतर काही वेळात श्रोत्यांना आपलेसे करून घेणे गरजेचे असते. ते जेवढय़ा कमीत कमी वेळेत करून घेता येईल तेवढे जास्त चांगले. हा क्षण आपल्याबाबतीत नेमका कधी येऊ शकतो ते तपासून पाहा.
  • स्पर्धेत आपले सादरीकरण करताना स्वत:विषयी पूर्णपणे आत्मविश्वास बाळगा.
  • विषय मांडताना आपले भाषण इतरांपेक्षा वेगळे कसे ठरेल, वेगळे विचार त्यात कसे येतील त्याकडेही लक्ष द्या.
  • विषय कोणताही असला तरी त्यावर आपल्याला बोलता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यास आणि आपल्या मनाचीही तयारी असली पाहिजे.
  • ‘कुतूहल असणे’ हे आपल्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे असे समजा.