05 December 2019

News Flash

‘वक्ता दशसहस्रेषु’ २८ जानेवारीपासून

राज्यातील आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता’ची स्पर्धा; महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी

राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ताची स्पर्धा; महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी

‘अमृतातेही पैजा जिंके’ असे ज्या मराठी भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे, त्या मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आपल्या अमोघ वक्तृत्वाने देशाच्या इतिहासाला दिशा देणारे वक्ते! या वक्त्यांची परंपरा जपण्यासाठी आणि राज्यभरातील महाविद्यालयीन तरुणांना विविध विषयांवर ‘बोलते’ करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात २८ जानेवारीपासून होणार आहे. राज्यभरातील आठ केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून त्यानंतर विभागीय अंतिम फेरी ४ ते ११ फेब्रुवारी यादरम्यान पार पडेल. १७ फेब्रुवारी रोजी महाअंतिम फेरी मुंबईत रंगेल.

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक’ आणि ‘इन्स्टिटय़ुट ऑफ करिअर डेव्हलपमेण्ट’ या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेचे ‘झी २४ तास’ टेलीव्हिजन पार्टनर आहेत. गेल्या दोन वर्षांत राज्यभरात जवळपास सातशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. विषयांमधील वैविध्य, ते विषय मांडताना मतांमधील वेगळेपणा अशा गोष्टींमुळे सुरुवातीपासूनच या स्पर्धेने वक्तृत्व स्पर्धाच्या अवकाशात मानाचे स्थान निर्माण केले.

स्पर्धेचा तपशील

यंदा या स्पर्धेची सुरुवात २८ जानेवारीपासून होणार असून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे या आठ केंद्रांवरील प्राथमिक फेरी २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी यांदरम्यान होणार आहेत. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या वक्त्यांची विभागीय अंतिम फेरी ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहेत. या विभागीय अंतिम फेरीत प्रत्येक विभागात सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ वक्त्यांची महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत रंगणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे विषय लवकरच जाहीर करण्यात येतील.

 

First Published on January 5, 2017 1:08 am

Web Title: loksatta oratory competition 3
Just Now!
X