प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले वक्तृत्वशास्त्रहे पुस्तक १९१८ मध्ये प्रकाशित झाले होते. या विषयावरील भारतीय भाषांमधील ते पहिलेच पुस्तक असावे. लोकमान्य टिळक यांनीही या पुस्तकाची शिफारस केली होती. पुढे या पुस्तकात काही बदल करून प्रबोधनकार यांनी वक्तृत्व- कला आणि साधनाहे पुस्तक लिहिले. या पुस्तकात एकूण १४ प्रकरणे असून त्यातील आवाजाचे आरोग्य आणि महत्त्वया प्रकरणातील काही भाग..

कला वक्तृत्वाची;प्रबोधनकार ठाकरे

आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.

भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो.

आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.

उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले.

आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.

आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो.

माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.

untitled-2

संकलन –  शेखर जोशी

(‘प्रबोधनकारडॉटऑर्गया संकेतस्थळाच्या सौजन्याने)