राज ठाकरे यांच्या मोदीमुक्त भारताच्या हाकेला जनमानसामध्ये चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या जाहीर भाषणामध्ये मोदी सरकारवर घणाघाती टिका केली. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेप्रमाणे ‘मोदीमुक्त भारता’ची हाक राज ठाकरेंनी दिली. राज ठाकरेंच्या या मागणीबद्दल वाचकांना काय वाटतं हे जाणुन घेण्यासाठी ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं फेसबुकवर पोल घेतला, “मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदीमुक्त भारतासाठी विरोधकांना एकत्र येण्याचं केलेलं आवाहन पटतं का?” जवळपास नऊ हजार वाचकांनी या पोलमध्ये सहभाग घेतला आणि तब्बल ६३ टक्के वाचकांनी मोदीमुक्त भारताच्या त्यांच्या हाकेला अनुकूल प्रतिसाद दिला.

सत्ता स्थापन केल्यानंतर पहिली तीन वर्षे भारतीय जनमानसावर राज्य करणाऱ्या नरेंद्र मोदींची पकड गेल्या काही महिन्यांमध्ये ढिली होताना दिसत असून समाज माध्यमांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नाडले गेलेले उद्योजक, रेल्वेचा कमालीचा भोंगळ कारभार, नवीन नोकऱ्या देण्यात आलेले अपयश, विजय माल्या आणि नीरव मोदीच्या रुपानं पुन्हा डोकं वर काढलेला भ्रष्टाचार, रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींनी आज केलेलं आंदोलन आणि मुंबईकरांचे झालेले हाल अशा विविध माध्यमांमधून मोदी सरकारविरोधात रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश व बिहारच्या पोटनिवडणुकांमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात गेलेलं बघायला मिळालं आहे. तर चंद्राबाबू नायडूंनी वेगळं होण्याचा पर्याय निवडून मित्रपक्षही विरोधी होत असल्याचं सूचित केलं आहे. भाजपाच्या खांद्याला खांदा लावून गेल्या लोकसभा निवडणुका लढलेल्या राजू शेट्टींनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांनी एकेकाळी नरेंद्र मोदींची केवळ स्तुतीच केली नव्हती तर तेच पंतप्रधानपदासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले होते त्या राज ठाकरेंनी मोदीमुक्त भारताची हाक देणं आणि त्याला वाचकांनी अनुकूल कौल देणं सूचक आहे. येत्या वर्षभरात राजकारणाची दिशा कशी राहील याची चुणूक या पोलमधून दिसली आहे हे निश्चित!

काय सांगत आहे पोलची आकडेवारी

या पोलमध्ये एकूण ८ हजार ९०० हून अधिक जणांनी आपली मते नोंदवली. त्यापैकी ६३ टक्के लोकांनी राज यांनी दिलेला मोदी मुक्त भारतचा नारा योग्य असल्याचे मत नोंदवले. म्हणजेच ८ हजार ९०० पैकी ५ हजार ६०० जणांनी राज यांना समर्थन दर्शवले आहे. तर ३७ टक्के म्हणजेच ३ हजार ३०० जणांना राज यांची ही भूमिका पटलेली नसल्याचे या पोलमध्ये दिसून आले.

 

तर ट्विटरवर याच प्रश्नाला उत्तर देताना ६४ टक्के वाचकांनी राज यांचे समर्थन केले तर ३६ टक्के वाचकांनी राज यांना विरोध दर्शवला