दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आरे कारशेडच्या जागेच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पर्यायी जागेचा तोडगा जाहीर केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ची आरेतील कारशेड रद्द करून ती जागा राखीव वन जाहीर करतानाच मुख्यमंत्र्यांनी कारशेड कांजूरमार्गला उभारणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आरे कारशेड हलवण्याचा निर्णय दुर्देवी असून अहंकारातून हा निर्णय घेतल्याचा आरोप करत फडणवीस यांनी आर्थिक नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या अन्य काही नेत्यांनाही या निर्णयाचा विरोध केला आहे. आरे कारशेड कांजुरला स्थलांतरित करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसमाने आल्याचे चित्र पहायाला मिळत आहे. मात्र यासंदर्भात लोकसत्ता डॉट कॉमच्या वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमने ट्विटरवर जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या ट्विटर पोलमध्ये २० हजार ८०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवलं असून मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्गला स्थलांतरित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय योग्य नसल्याचे मत ७४.५ टक्के वाचकांनी नोंदवलं आहे.

आरे कारशेडवरुन सरकार विरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यरोप होत असतानाच लोकसत्ता डॉट कॉमने ट्विटरवर सोमवारी (१२ ऑक्टोबर २०२० रोजी) ‘मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्गला स्थलांतरित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय योग्य वाटतो का?’ असा प्रश्न वाचकांना विचारला होता. या प्रश्नावर होय आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते. २४ तासांमध्ये २० हजार ८५५ वाचकांनी यावर आपले मत नोंदवले. २० हजार ८५५ वाचकांपैकी ७४.५ म्हणजेच १५ हजार ५३७ वाचकांनी ठाकरे सरकारचा निर्णय योग्य नसल्याचे मत व्यक्त केलं आहे. तर २५.५ टक्के म्हणजेच पाच हजार ३१८ वाचकांनी ठाकरे सरकारचा निर्णय योग्य असल्याचे मत नोंदवलं आहे.

या जनमत चाचणीमध्ये ट्विटरवर जवळजवळ २०० वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा पोल ६२० वेळा रिट्विट करण्यात आला आहे.