वय आणि व्यवसाय यानुसार खाण्याच्या गरजा बदलत जातात तसेच पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या कामातल्या वैविध्यतेमुळे खाण्यातल्या पौष्टिकतेचा वेगळा विचार करणे गरजेचे असते. हेच लक्षात घेऊन वैद्य प. य. खडीवाले यांनी सिद्ध केलेल्या ‘पूर्णब्रह्म’ या पाककृती संग्रहाचे प्रकाशन येत्या सोमवारी २९ जून रोजी मांटुगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.
या समारंभासाठी स्वत: वैद्य खडीवाले उपस्थित राहणार असून यावेळी प्रेक्षकांना त्यांच्याशी थेट संवाद साधून खाद्यविषयक शंकांचे निरसन करण्याची संधीही मिळणार आहे. चारशेपेक्षा जास्त पाककृती असणाऱ्या ‘पूर्णब्रह्म’ या पाककृती संग्रहात विद्यार्थी, युवक, स्त्री, श्रमिक, नोकरदार, वृद्ध आणि खेळाडू असे सात विभाग करण्यात आले असून वेगवेगळ्या वयानुसार आणि व्यवसायाच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थाच्या पाककृतींचा यात समावेश करण्यात आला आहे.
रोजच्या जेवणासाठीच्या पदार्थाबरोबरच सकाळी व संध्याकाळी नाश्त्यासाठी करता येतील अशा पौष्टिक पाककृतींचाही यात समावेश आहे. याशिवाय पारंपरिक तसेच आत्ताच्या पिढीच्या आवडीच्या खाद्यपदार्थाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. ‘पूर्णब्रह्म’ या पाककृती संग्रहाची किंमत ५० रुपये असून तो ३० जूनपासून सर्वत्र उपलब्ध असेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य दिले जाईल.
गेल्या वर्षीही ‘लोकसत्ता’ने ‘पूर्णब्रह्म’ या पाककृती संग्रहाचा प्रथम अंक प्रकाशित केला होता. त्याला वाचकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे यावेळच्या या विशेष पाककृती संगहाचे नियोजन करताना आजच्या धकाधकीच्या गतिमान काळात आरोग्य आणि आहार यांचे संतुलन राखणाऱ्या पाककृतींचा विशेष विचार केला गेला आहे. त्याचबरोबर तरुणांपासून वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील पचनशक्ती आणि रुची यांचा विचारही केला गेला आहे. खेळाडूंसाठीचा स्वतंत्र विभाग हे या संग्रहाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. वैद्य प. य. खडीवाले यांच्याकडून थेट या पाककृती लोकांसमोर येणार असल्याने वाचकांना या संग्रहाचीही विशेष उत्सुकता आहे.
*कार्यक्रम..
अंकाचे प्रकाशन व प्रेक्षकांच्या प्रश्नांना वैद्य प. य. खडीवाले यांची थेट उत्तरे.
*कधी?
उद्या, सोमवारी २९ जूनला
सायंकाळी ५ वाजता.
*कुठे?
यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा,
शिवाजी मंदिरसमोरील गल्ली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 28, 2015 5:02 am