‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या प्रकाशन सोहळय़ानिमित्त विशेष कार्यक्रम
मसालेदार कोंबडीचा रस्सा, साजूक तुपातील पुरणपोळी, सकाळची भूक भागवणारे कांदेपोहे आणि झणझणीत मिसळ हे सगळे पदार्थ महाराष्ट्राच्या मातीतले. तिखट, गोड, आंबट अशा प्रत्येक प्रकारची चव लज्जतदारपणे समोर आणणाऱ्या वैविध्यपूर्ण पदार्थानी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे. या समृद्धतेचाच आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकाच्या प्रकाशनानिमित्त येत्या गुरुवारी, ३० जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पाच नामवंत शेफ खाद्यसंस्कृतीबाबत रसिकांशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्राच्या एका भागातील वैशिष्टय़पूर्ण पदार्थाची दुसऱ्या भागातील खवय्यांशी ओळख करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’ अंकातून ‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ ही संकल्पना मांडली आहे. मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा) आणि विष्णू मनोहर (विदर्भ) या नामांकित शेफनी या अंकातून महाराष्ट्रातील रुचिसंपन्न खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली आहे. खाद्यसंस्कृतीबरोबरच त्या त्या प्रांतातील चवदार, चटकदार, चमचमीत पाककृती तेवढय़ाच आकर्षित छायाचित्रांसह या अंकात वाचायला मिळणार आहेत.
खवय्यांची भूक भागवण्यासोबत मेंदूला खुराकही देणाऱ्या ‘पूर्णब्रह्म’ अंकाचे गेल्या आठवडय़ात ठाण्यात प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नामवंत शेफनी विस्मरणात गेलेल्या पाककृती, प्रांतानुसार पदार्थाची बदलणारी चव आदी गोष्टींवर श्रोत्यांशी गप्पा मारल्या होत्या. त्याच धर्तीवर आता मुंबईतही पूर्णब्रह्मच्या प्रकाशनानिमित्ताने येत्या गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काही पाककृतींचे सादरीकरणही होणार आहे.

* ‘पूर्णब्रह्म’ विशेष कार्यक्रम
* कधी : गुरुवार, ३० जून
* कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
* वेळ: सायं. ६.३० वा.
* प्रवेश सर्वासाठी खुला

‘विम’ने प्रस्तुत केलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकाचे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून ‘टेस्ट पार्टनर’ रामबंधू आहेत. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’, ‘आयुशक्ती’ यांचे या उपक्रमाला पाठबळ लाभले आहे तर, ‘कलर्स मराठी’ टेलिव्हिजन पार्टनर आहेत.