‘लोकसत्ता क्यू’ हा ‘लोकसत्ता’च्या जाणत्या वाचकांना नजरेसमोर ठेवून येत्या रविवारच्या अंकातून सुरू करण्यात येत असलेला नवा साप्ताहिक उपक्रम. नेमका काय आहे तो? त्यातील ‘क्यू’ म्हणजे काय?

तर ‘क्यू’ हे इंग्रजी अक्षर लघुरूप आहे ‘क्वेस्ट’चे, ‘क्वीझ’चे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘क्वालिटी’चे – दर्जाचे. यात दर्जेदार प्रश्न आहेत. त्यांची पर्यायी उत्तरे आहेत. त्यातील योग्य उत्तरे वाचकांनी ‘लोकसत्ता’ला कळवायची आहेत. परंतु ही नेहमीची प्रश्नमंजुषा नाही.

आजच्या ‘गुगल’च्या जमान्यात अशा प्रश्नमंजुषांना तसाही काही अर्थ नसतो. संगणकाची एक कळ दाबताच माहितीच्या महाजालातून हवी तेवढी माहिती आपणास मिळू शकते. तेव्हा उत्तरे शोधणे हे काही कठीण काम नाही. कठीण आहे ते योग्य प्रश्न सापडणे. आपले ज्ञान अद्ययावत असण्यासाठी असे प्रश्न समोर येणे आवश्यक असते. ते समोर नसतील, तर उत्तरांकडे जाण्याचा मार्ग निसरडाच होऊन जातो.

‘लोकसत्ता क्यू’ या उपक्रमाचा नेमका हेतू हाच आहे. त्यातून आपल्यासमोर दर रविवारी विशेष पानामध्ये असे आगळेवेगळे दहा प्रश्न मांडण्यात येणार आहेत. तेथे त्यांची पर्यायी उत्तरेही देण्यात येणार आहेत. या प्रश्नांची निवड करणार आहेत ‘नॅशनल जीऑग्राफिक’चे माजी उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचे माजी सदस्य सुनील धवला. परंतु बेंगळूरुस्थित सुनील धवला यांची आणखीही एक ओळख आहे. व्यापार, बँकिंग, साहित्य-संस्कृती, पर्यावरण, शिक्षण, भूगोल, इतिहास, आरोग्य.. अशा विविध विषयांचे ते प्रश्नमंजुषाकार आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या, महाविद्यालये, शाळांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ते स्वत: लेखक आणि व्याख्यातेही असून, आयएमआय, दिल्लीतून त्यांनी वित्त आणि मानवी संसाधन या विषयावर एमबीए केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयातून त्यांनी नवी दिल्लीतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरिन ट्रेड’ या संस्थेतून पदवी संपादन केली आहे.

‘लोकसत्ता क्यू’च्या माध्यमातून ते लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वानाच हे प्रश्न विचारणार आहेत. आपल्याला त्यांची उत्तरे ‘लोकसत्ता’ला कळवायची आहेत. त्याचा अधिक तपशील रविवारच्या अंकात.