रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर अनधिकृतरीत्या आलेले आमदार जयंत पाटील यांनी कोणतेही कारण नसताना ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना गुरुवारी दुपारी मारहाण केली.

याप्रकरणी आमदार पाटील यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याविरुद्ध संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

देशातील अन्य लोकसभा मतदारसंघांबरोबरच रायगड मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू झाली. विसाव्या फेरीअखेर तटकरे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर आमदार पाटील, आमदार पंडित पाटील व आमदार धैर्यशील पाटील हे तिघेजण अन्य कार्यकर्त्यांसमवेत दुपारी पावणेतीनच्या सुमारास मतमोजणी केंद्राच्या परिसरातील माध्यम कक्षाबाहेर आले. त्या ठिकाणी पत्रकार विजयी उमेदवार सुनील तटकरे यांची मुलाखत घेत होते. आमदार पाटील यांनी तेथे अचानक आक्रमक पवित्रा घेत, ‘तुम्ही काहीही बातम्या छापता. आम्ही आलो की नाही निवडून?’ असे म्हणत कशाळकर यांना मारहाण सुरू केली. सुदैवाने तेथे हजर असलेल्या पत्रकारांनी त्यांची सुटका केली. मात्र पोलिसांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली.

हा प्रकार झाल्यानंतर आमदार पाटील कार्यकर्त्यांसह मतमोजणी कक्षात पोचले. तोपर्यंत या प्रकाराची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी तत्काळ तीनही आमदारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी या सर्वाना बाहेर काढले. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच आमदार पाटील यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे .

पत्रकार कशाळकर यांना झालेल्या मारहाणीचा विविध पत्रकार संघटनांबरोबरच सामाजिक संघटनांनी निषेध केला असून आमदार पाटील यांच्या गैरवर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, आमदार पाटील यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

‘हा प्रकार चुकीचा असून हे सर्व जण बेकायदेशीररीत्या आत कसे आले, याची कसून चौकशी केली जाईल व दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.’    – डॉ. विजय सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी