मुंबई : ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील संस्थांना दानशूरांनी यंदाही भरभरून प्रतिसाद दिला. दात्यांनी या दानयज्ञात घसघशीत दान टाकत सेवाव्रतींच्या कार्याला भक्कम पाठबळ दिले आहे. या दानयज्ञाचा सांगता सोहळा बुधवार, ३० ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार असून, या वेळी या संस्थांच्या प्रतिनिधींकडे धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहेत.

विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे नववे पर्व. या नऊ वर्षांत दानशूरांनी ९२ संस्थांना मदतीचा हात देत त्यांच्या कार्याला भक्कम पाठबळ दिले.

या उपक्रमांतर्गत यंदा गणेशोत्सवादरम्यान १० संस्थांची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यात महापुरामुळे नुकसान झालेले सांगली जिल्हा नगर वाचनालय, धरणफुटीनंतर ग्रामस्थांना आधार देणारी तिवरे येथील न्यू इंग्लिश स्कूल, सर्वसामान्यांची रुग्णसेवा करणारे  साने गुरुजी रुग्णालय, अमरावतीतील शाश्वत कन्सेप्ट स्कूल, वंचित, गरीब मुलांसाठी आधारवड ठरलेले स्नेहवन, पन्हाळ्यातील नवशिक्षण प्रसारक मंडळ,  संगीत प्रसार करणारी स्वरांकित, बदलापुरातील अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम- पाणवठा, नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड, ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थांचा समावेश होता.

दर वर्षीप्रमाणे यंदाही वाचकांनी मोठे आर्थिक पाठबळ देत विधायक कार्यासाठी या संस्थांचे हात बळकट केले आहेत. या दानयज्ञाची सांगता ३० ऑक्टोबरला समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. सोहळ्यात या संस्थांच्या प्रतिनिधींकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येतील.