मुंबई : व्रतस्थ वृत्तीने विधायक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे दहावे पर्व शनिवारी, गणेश चतुर्थीपासून सुरू होत आहे.

आर्थिक अडचणींचा सामना करूनही विविध क्षेत्रांत प्रकाशवाटा दाखविणाऱ्या संस्थांच्या कार्याला पाठबळ देणे हे आपले कर्तव्य समजून ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम हाती घेतला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संस्थांचा परिचय या उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या नऊ वर्षांत या उपक्रमाद्वारे दानशूरांनी ९२ संस्थांना मदतीचा हात दिला. सकारात्मक कार्यात आपलाही हातभार लागावा, असे वाटणारे लाखो वाचक आणि संस्था यांच्यात ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाद्वारे दानरूपी सेतू उभारला आहे.

विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या दहा संस्थांचा परिचय यंदा या उपक्रमाद्वारे करून देण्यात येणार आहे.  उपेक्षित, वंचितांचा आधार ठरलेल्या, महाराष्ट्राचे बुद्धिवैभव जपणाऱ्या संस्थांबरोबरच विविध क्षेत्रांतील संस्थांचा त्यात समावेश आहे. दहाव्या पर्वातील या दानयज्ञाला दानशूरांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहेच.

मदतनिधीसाठी ऑनलाइन सुविधा

या उपक्रमातील संस्थांसाठी ऑनलाइन मदतनिधी जमा करण्याची सुविधा कॉसमॉस बॅंकेच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देश-विदेशातील दानशूरांना त्याचा लाभ घेता येईल. याबाबतचा तपशील लवकरच देण्यात येईल.