अभ्युदय बँकेच्या साह्य़ाने ‘लोकसत्ता’चा उपक्रम
प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेची शक्ती कार्यरत असते असे मानले जाते, फक्त त्या शक्तीला ओळखणे आणि ती प्रत्यक्षात वापरणे गरजेचे असते. अशाच काही ‘दुर्गा’ ज्या आपल्यातल्या या ऊर्जेला ओळखून समाजात धाडसाने आणि धडाडीने विधायक कामे करत आहेत अशा दुर्गाचा ‘लोकसत्ता’ शोध घेत आहे. येत्या नवरात्रोत्सवानिमित्ताने यंदाही ‘शोध नवदुर्गेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात समाजातील नऊ ‘दुर्गा’ची निवड केली जाणार आहे. त्यासाठी वाचकांना आवाहन करण्यात येत आहे. अभ्युदय बँक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
समाजातील ही ‘दुर्गा’ असेल तुमच्या-आमच्यातलीच, परंतु धाडसी, नेहमीच्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन नवे कार्य घडवणारी किंवा समाजातल्या वंचितांना मायेची सावली देणारी, त्यासाठी कदाचित समाजाच्या, कुटुंबीयांच्याही विरोधात जाऊन विधायक उपक्रम
राबविणारी किंवा ही ‘दुर्गा असेल स्वत:मध्ये ऊर्जेला व्यापक करत एकाच वेळी तीन ते चार पातळ्यांवर काम करीत अव्वल स्थान पटकवणारी.
तुम्ही पाठवू शकता, तुमची स्वत:ची माहिती किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात अशी एखादी ‘दुर्गा’ कार्यरत असेल तर त्यांची छायाचित्रासह विस्तृत माहिती.
अर्थात ही माहिती त्या ‘दुर्गे’च्या परवानगीनेच पाठवायची आहे. ही माहिती ईमेलद्वारे किंवा आमच्या कार्यालयीन पत्त्यावर २० सप्टेंबपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या उपक्रमात केवळ नऊच दुर्गा निवडायच्या असल्याने अंतिम निर्णय परीक्षकांचाच राहील.
तेव्हा आपल्या माहितीतल्या अशा नवदुर्गेची आदर्श म्हणून ओळख व्हावी, असे तुम्हाला वाटत असेल तर वरील नियमांत बसणाऱ्या तरुणीची वा महिलेची माहिती ‘लोकसत्ता’ कार्यालयात पाठवावी.
आमचा पत्ता
लोकसत्ता शोध नवदुर्गेचा,
ई एल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा loksattanavdurga@gmail.com