News Flash

औंध संगीत अमृतमहोत्सव अभिजात स्वरांत रंगला

महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत परंपरेची आठवण जपणारा औंध संगीत महोत्सव यंदाही अभिजात स्वरांत रंगला.

गायक पंडित अरुण कशाळकर

महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत परंपरेची आठवण जपणारा औंध संगीत महोत्सव यंदाही अभिजात स्वरांत रंगला. सलग दोन दिवसांचा संगीत महोत्सव ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’च्यावतीने आयोजित करण्यात आला. या महोत्सवाला ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक होते. सातारा येथील औंध कलामंदिरात हा सोहळा पार पडला.

गेली ७५ वर्षे तमाम शास्त्रीय संगीतातील रसिकांना एका सुरात गुंफणारा महोत्सव म्हणून औंध महोत्सवाची ओळख आहे. औंध संस्थानचे दरबारी गायक गायनाचार्य पं. अनंत जोशी व त्यांचे पुत्र पं. गजाननबुवा या पिता-पुत्रांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांना स्वरसुमनांजली वाहण्यासाठी या संगीत महोत्सवाची परंपरा १९४० साली सुरू केली. शास्त्रीय संगीताच्या विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या या महोत्सवात दरवर्षी देशभरातील अनेक रियाझी गायक व वादक सहभागी होत असतात. यंदाही सहा सत्रांत एकूण १९ कलाविष्कार सादर करण्यात आले असून त्यासाठी ३१ कलावंतांनी सहभाग नोंदवला.

महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. रामभाऊ पवार यांनी वयाच्या ८६व्या वर्षीही ‘बिन देखे चैन’ ही तीन तालातील बंदीश गाऊन रसिकांची मने जिंकली. रामभाऊंचे नातू केतन पवार यांनी तबल्यावर साथ केली. गणेश बोडस यांनी महोत्सवाच्या वाटचालीत मोलाचा वाटा असणाऱ्यांना वंदन केले. कैलाश पात्रा यांचे व्हायोलिनवादन झाले. त्यांनी राग ललत पंचममधील एक गत सादरकेली. त्यांना तबल्यावर स्वप्निल भिसे यांनी साथ केली. पहिल्या सत्राची सांगता जयपूर घराण्याच्या गायिका मंजिरी असनारे-केळकर यांच्या गायनाने झाली. मंजिरी यांनी आपले गुरू पं. मधुसुदन कानिटकर यांची रचना सादर केली. त्यांना मिलिंद पोटे यांनी तबल्यावर, तर हार्मोनियमवर तन्मय देवचके यांनी साथ केली.

दुसऱ्या सत्रात पंडित योगेश समसी यांनीा पंजाब घराण्याच्या शैलीत तबलावादन केले. त्यानंतर ‘रियाझ’ या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव अजय आंबेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ललित कला केंद्र (गुरुकुल) भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाई आदी उपस्थित होते. याचवेळी ज्येष्ठ गायक पं. वेंकटेशकुमार यांच्या हस्ते मीरा म्युझिक प्रकाशित अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन झाले. तसेच प्रतिष्ठानतर्फे www.gajananbuwajoshi.com या संकेतस्थळावर पं.गजाननबुवा जोशी यांचे आत्मचरित्र व व्हायोलिनच्या गती हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले.

सुप्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचे गायन झाले. त्यांनी ठुमरी सादर केली. त्यावेळी अनिश प्रधान यांनी तबल्यावर तर हार्मोनियमवर सुधीर नायक यांनी साथ केली. पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात किराणा व ग्वाल्हेर घराण्याची तालीम असलेले ज्येष्ठ गायक पंडित व्यंकटेशकुमार यांनी मारुबिहाग रागातील रचना सादर केली. तर कन्नड भजनाने समाप्ती केली. भरत कामत यांनी तबल्यावर तर सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमवर साथ केली.

दुसऱ्या दिवशी सत्राची सुरुवात पं.गजाननबुवा यांची नात पल्लवी जोशी यांच्या गायनाने झाली. यावेळी मिलिंद पोटे यांनी तबल्यावर, तर प्रवीण कासलीकर यांनी हार्मोनियमवर साथ केली. पं.गजाननबुवाचे शिष्य पं.विकास कशाळकर यांनी सारंग व शिव भैरव रागातील रचना सादर केल्या. यावेळी स्वप्निल भिसे यांनी तबल्यावर, तर संवादिनीवर प्रवीण कासलीकरांनी साथ केली. सत्राची सांगता जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन झाले. यावेळी तबलासाथ भरत कामत व हार्मोनियमवर सुयोग कुंडाळकर यांनी केली.
दुसऱ्या सत्रात पं.गजाननबुवा यांच्या ज्येष्ठ शिष्या जयश्री पाटणेकर यांच्या गायनाने झाली. त्यानंतर पंडित बबनराव हळदणकर यांचे गायन झाले. तर या सत्राची सांगता सोनिया परचुरे यांच्या कथ्थक नृत्याने झाली. संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर, तबलासाथ आशय कुलकर्णी व गायनसाथ रोहित धारप यांनी केली. तसेच पढंत त्यांच्या शिष्या गायत्री आपटे व क्षितिजा भाटे यांनी केली. यांनतर अपूर्वा गोखले, पंडित अरुण कशाळकर, संजीव चिम्मलगी आदींचे गायन झाले. तर रवी चारी व नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन आणि राकेश चौरासिया यांचे बासरीवादन झाले. तर उत्सवाची सांगता पं.गजाननबुवांच्या शिष्या शुभदा पराडकर यांच्या सतारवादनाने झाली.
कलाकारांना साथसंगत करण्यासाठी हार्मोनियमवर सुधीर नायक, सुयोग कुंडलकर, तन्मय देवचके, चिन्मय कोल्हटकर, प्रवीण कासलीकर तर तबल्यावर पंडित विजय घाटे, अनिश प्रधान, उस्ताद फझल कुरेशी, मिलिंद पोटे, भरत कामत, स्वप्निल भिसे, श्रुतिन्द्र कातगडे आदी सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:51 am

Web Title: loksatta sponsor aundh music festival
Next Stories
1 १५० रुपयांची लाच.. १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता..!
2 दूषित पाण्यामुळे बालकाचा मृत्यू
3 शाहरूखची चौकशी
Just Now!
X