‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

मुंबई : तरुणाईच्या सर्जनशीलतेला आणि जिद्दीला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाच्या नोंदणीला राज्यभरातून दमदार प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात १३ फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरून नोंदणी करता येईल.

जिद्दीच्या जोरावर कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या तरुणाईमुळे ती क्षेत्रे समृद्ध होतात. त्याचबरोबर या क्षेत्रांत पाऊल टाकणाऱ्यांपुढे आदर्श निर्माण होतात. असे आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाईचा शोध सुरू झाला असून गेल्या आठवडय़ापासून नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ऑनलाइन भरल्या जात आहेत.

विविध क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून करण्यात येते. दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. कायद्यामार्फत जनआंदोलनाचा आधार ठरणारे, अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, तिरस्कृतांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांची सखी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला गौरविण्यात आले.

प्रायोजक :  हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत. उपक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर ‘एबीपी माझा’ आहे. तर नॉलेज पार्टनर ‘पीडब्ल्यूसी’ आहेत.

अर्ज कसा भराल?

या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील  https:// tarun tejankit.loksatta.com/  येथे पाहायला मिळतील. येथे असलेली प्रवेशपत्रिका १३ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन भरून पाठवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येणार आहेत.