आगळ्या उपक्रमाची घटस्थापना; निवडप्रक्रिया तपशील लवकरच

हल्लीची तरुण पिढी काहीच कामाची नाही.. हे त्या आधीच्या पिढीचे पालुपद. पिढ्यानपिढ्या ते सुरू आहे. परंतु त्यात तथ्य असते का? नसते, ही ‘लोकसत्ता’ची भूमिका आहे. याचे कारण – आजची तरुणाई बहकलेली आहे असे म्हणताना या ‘बहकलेपणा’तूनच, चाकोरी मोडण्यातूनच ती नवे काही सृजनात्मक घडवीत आहे, हे अनेक क्षेत्रांत स्पष्टपणे दिसते आहे. गरज आहे ती हे देदीप्यमान तरुण  समाजासमोर आणण्याची, आजच्या तरुणांची नवनिर्मिती, त्यांचे कर्तृत्व, त्यांच्याकडून समाजास मिळत असलेली ऊर्जा यांचे भरभरून कौतुक करण्याची.. त्या ऊर्जावंतांचा गौरव करण्याची. याच हेतूने ‘लोकसत्ता’ सुरू करीत आहे घटस्थापनेच्या सुमुहूर्तावर एक नवा प्रेरणादायी उपक्रम – ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
Forest Recruitment marathi news
वनखात्यातील वनरक्षक भरतीप्रक्रिया; शारीरिक चाचणीत अव्यवस्थेचा आरोप
Emphasis on use of processed water decision of Navi Mumbai Municipal Corporation
प्रक्रियायुक्त पाणी वापरावर भर, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

साहित्य-कलेपासून समाजसेवेपर्यंत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवून काम करणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. आपल्या कामाने, त्यामागील विचाराने त्या-त्या क्षेत्रालाही ते नवे आयाम देत आहेत. कोणी आपल्या नैपुण्याने कलाक्षेत्र गाजवीत आहे, तर कोणी सर्व कोलाहलापासून दूर राहून वैज्ञानिक प्रयोगशाळांत नवनवे शोध लावत आहे. कोणी एखाद्या खेडय़ाला विकासाचे नवे मंत्र देत आहे, तर कोणी राजकारणाच्या क्षेत्रातील चिखल बाजूला सारून सत्तेला सेवेचा सुगंध देण्याचे काम करीत आहे. भविष्याने ज्यांच्याकडे आस लावून पाहावी असे हे राष्ट्राचे वर्तमान. त्या सर्वाचा संघर्ष, त्यांचे यश हे सारेच प्रेरणादायी. ते समाजासमोर यावे आणि एका कृतज्ञ भावनेने समाजाने त्यांच्या कामाचा गौरव करावा, या कर्तव्यभावनेतूनच ‘लोकसत्ता’ हा उपक्रम सुरू करीत आहे.

यातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या तेजाने तळपत असलेल्या, परंतु सहसा माध्यमांच्या प्रकाशझोतात न आलेल्या, वयाच्या चाळिशीआतल्या तरुण तेजांकितांचा शोध घेण्यात येणार आहे. हे लखलखते हिरे पारखले आणि निवडले जातील ते अर्थातच नामवंतांच्या एका स्वतंत्र समितीकडून. महाराष्ट्राला आपल्या कार्याने ललामभूत झालेल्या काही मान्यवर मातबरांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात त्या तेजांकितांचा खास गौरव केला जाईल.. हा गौरव, हा सत्कार म्हणजेच महाराष्ट्रातील जाणत्या जनांच्या वतीने ‘लोकसत्ता’ने आजच्या तरुणाईतील सर्जनशीलतेला दिलेली एक खास दाद.